दोन दिवस पुरेल इतकेच दूध विक्रेत्यांकडे उपलब्ध; गुजरातमधील अमूलचा खप वाढला
राज्यामध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचे तीव्र पडसाद दूध आणि भाजीपाला व्यवसायावर पडत आहे. नवी मुंबईत गुरुवारपासून दुधाची आवक घटल्याने येते दोन दिवस पुरेल इतकाच दुधाचा साठा कंपन्यांकडे शिल्लक आहे. तर दुसरीकडे दूध विक्री केंद्रातून (डेअरी) दुधाची दुप्पट किमतीने विक्री होत असून या संपाच्या आडून ग्राहकांची पिळवणूक होत आहे.
राज्यातील नाशिक, नगर, कोल्हापूर, इंचलकरजी, संगमनेर, सातारा आदि ठिकाणाहून मुंबईकरांसाठी दूधपुरवठा केला जातो. दैनंदिन दोन लाख लिटर दूध पुरविण्याची क्षमता या प्रत्येक जिल्ह्य़ाची आहे. पण मागील २४ तासांपासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा फटका दूध व्यवसायाला बसत आहे. कोल्हापूर, संगमनेर या जिल्ह्य़ांतून गुरुवारी रात्री पोलीस बदोबस्तात नवी मुंबईमध्ये दुधाच्या गाडय़ा रवाना झाल्या. मात्र या गाडय़ा आल्यांनतरही दुधाची चणचण मुंबई आणि नवी मुंबईकांराना सोसावी लागणार आहे. शेतकऱ्यांचा संप असाच सुरू राहिल्यास दुधाची आवक घटणार असल्याने दूध व्यवसायिकदेखील चिंतातुर आहेत. त्यामुळे हा संप सामंजस्याने मिटावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अशी प्रतिक्रिया दूध कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.
दरम्यान, दुधाच्या टंचाईचा पुरेपूर फायदा दूध डेअरी विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. ४८ ते ६० रुपये लिटर दराने विकले जाणारे सुट्टे दूध २० रुपये वाढीव दराने विकले जात आहे. तर कंपन्यांकडून येणारे दूधदेखील डेअरी विक्रेते अधिक भावाने विकत आहेत.
[jwplayer cJykxZM4]
दुधाच्या पावडर निर्मितीवर उत्पादकांचा भर
राज्यामध्ये शेतकऱ्यांचा संप सुरू असल्याने दुधाची टंचाई निर्माण झालेली असताना गुजरातहून वसई वर्सोवामार्गे अमुल कंपनीचे दूध बाजारात दाखल होत आहे. वसई व इतर मार्गावरून येणाऱ्या पट्टय़ात शेतकऱ्यांचा संप नसून खासगी टॅकरद्वारे दोन दिवसांत अमुल कंपनीने १६ लाख लिटर दुधाची विक्री मुंबईमध्ये केली. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. नामांकित वारणा, गोकुळ या कंपन्यांमध्ये स्टोरेज करण्यात आलेला दोन दिवस पुरेल इतका साठा आहे. तर दुधाची आवक कमी झाल्याने कंपन्यांनी दुधाच्या पावडर निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्यातील नाशिक, नगर, संगमनेर येथून रोज नवी मुंबईमध्ये विविध कंपन्यांचे २ लाख लिटर दूध येते. मात्र शेतकऱ्यांनी कंपनीकडे दूध न पाठविल्याने परिणाम झाला आहे. डेअरी दुकानदाराकडे असणारा साठा संपल्याने परराज्यातून आलेले दूध ज्यादा संपाची स्थिती अशीच राहिल्यास जादा दराने विक्री करण्याशिवाय पर्याय नाही.
– विठ्ठल बांगर, अध्यक्ष, दूध व्यवसायिक उत्पादक संघ, नवी मुंबई.