उरण : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र येऊन लढणाऱ्या महायुतीत उरण नगराध्यपदाच्या रणधुमाळीत मात्र फूट पडली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासह उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने यापूर्वीच स्वबळाचा नारा देत शोभा कोळी-शहा यांना नगराध्यपदाच्या रिंगणात उतरविले आहे. इतर जागांसाठीही भाजपने यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपने उरणमध्ये शिंदेसेनेला वाकुल्या दाखविल्याचे चित्र होते.
भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करताना राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही निवडणूक महायुती म्हणून लढू असे वक्तव्य केले होते. दरम्यान, महायुतीची भाषा करूनही भाजपचे स्थानिक नेते विश्वासात घेत नसल्याची ओरड शिंदेसेनेकडून सुरू होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाची बैठक घेत उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी दिली आहे. भाजपने उमेदवारी जाहीर करताना घटक पक्षांना विश्वासात घेतले नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे हे अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार गटही आक्रमक
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिंदे व अजित पवार गटाला डावलून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या दोन्ही गटांनी नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासह सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवारी अर्ज शेवटपर्यंत टिकणार की माघारी घेतले घेणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. उरण नगर परिषदेची २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. २०२१ मध्ये या नगर परिषदेच्या मुदत संपुष्टात आली आहे. गेल्या निवडणुकीत राज्यात भाजपा सेना युती असतानाही उरणमध्ये शिवसेना-भाजप यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढविली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आदी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. ९ प्रभागातून १८ सदस्य आणि एक नगराध्यक्ष अशी १९ पदांसाठी निवडणूक झाली होती. आता नगराध्यक्ष पदासह २१ नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
भावना घाणेकर महाविकास आघाडीच्या उमेदवार
उरण शहरात शिवसेना ठाकरे गटाची ताकद असतानाही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा भावना घाणेकर यांना उरणच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघ ठाकरे गटासाठी सोडण्यात आला होता. नगराध्यक्षपदासाठी म्हात्रे ठाकरे गटाने ही जागा शरद पवार यांच्या पक्षासाठी सोडली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी एकूण ९ अर्ज दाखल करण्यात आले. तर दहा प्रभागातील नगरसेवकांच्या २१ जागांसाठी एकूण ७८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती उरण नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
