सीबीडी येथील पडीक इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या युवतीच्या मित्राला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी एनआरआय पोलिसांकडे केली होती.
हेही वाचा >>> नवी मुंबई : जेवणाचे ताट डोक्यात मारून हत्या, मृत आणि आरोपी दोन्ही मनोरुग्ण
शिवम नलावडे (२०) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी तो, त्याचा मित्र आणि त्याची मैत्रीण असे तिघे मिळून सीबीडी सेक्टर-१५ मधील एका पडीक इमारतीत गेले होते. त्या ठिकाणी पाचव्या माळ्यावरून डकमध्ये युवतीचा तोल जाऊन ती खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती तिच्या सोबतच्या मित्रांनीच पोलिसांना दिली होती. ही माहिती मिळताच एनआरआय पोलीस पथक घटनास्थळी गेले व कायदेशीर कारवाई पार पाडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी मुलीचे नातेवाईक आणि त्यांच्या अनेक परिचितांनी एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा >>> नवी मुंबई: वाहन चोरी करणारे अटकेत; ३ स्कुटी २ रिक्षा जप्त
दरम्यान पोलिसांनाही तपासात काही गोष्टी खटकल्या होत्या. त्यामुळे रविवारी तिचा मित्र नलावडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी मद्य पार्टी झाल्याचे निदर्शनास आले होते. बिअर बाटल्या आणि खाद्यान्न आढळून आले होते. सुरुवातीला पोलिसांनी मयत युवतीचे वय १९ सांगितले होते. मात्र तिच्या घरच्यांनी दिलेली माहिती व तपासात ती युवती १७ वर्षांची असल्याचे समोर आले. अटकेत असलेला आरोपी आणि युवती यांचे एकमेकांच्या घरी नेहमीच जाणे-येणे होत होते. त्यांच्या मैत्रीबाबत दोन्हीकडील नातेवाईकांना पूर्वकल्पना होती. असेही चौकशीत समोर आले आहे. तरीही आरोपीने युवतीला ढकलून का दिले? हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.