नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला असून पुन्हा एकदा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी २८ ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता असून, मुक्कामाच्या सोयी-सुविधांची काटेकोर व्यवस्था करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, नवी मुंबईतर्फे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रविवारी (१७ ऑगस्ट) सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी आंदोलनाचा आराखडा, आंदोलकांच्या मुक्काम, भोजन, आरोग्य व सुरक्षेची तयारी, तसेच शासन व प्रशासनाशी समन्वयाचा आढावा घेण्यात आला. शासनाने याआधी दिलेली आश्वासने पूर्णत्वास न गेल्याने समाजात नाराजी असून, ‘आरक्षणाशिवाय माघार नाही’ हा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जरांगे पाटील यांची संघर्ष यात्रा

मनोज जरांगे पाटील २७ ऑगस्ट रोजी अंतरवली-सराटी येथून संघर्ष यात्रेला प्रारंभ करणार आहेत. अहिल्यानगर मार्गे येताना त्यांचा पहिला मुक्काम किल्ले शिवनेरी येथे राहील. त्यानंतर जुन्नर, चाकण, तळेगाव, खोपोली, पनवेलमार्गे ते २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी नवी मुंबईत दाखल होतील. या प्रवासात हजारो आंदोलनकर्ते सहभागी होणार असून, मुंबई गाठण्याआधी नवी मुंबईत लाखोंचा मुक्काम होईल, असा अंदाज सकल मराठा समाजातर्फे वर्तविण्यात आला आहे.