scorecardresearch

नवी मुंबई : स्वच्छता अभियानात देशात तिसरा राज्यात पहिला क्रमांकाचे शहर अद्याप हागणदारीमुक्त नाही; प्रशासन अनभिज्ञ

एमआयडीसीतील बोनसारी गावात केवळ एक सार्वजनिक शौचालय आहे. ज्यात पाण्याची सोय नाही.

नवी मुंबई : स्वच्छता अभियानात देशात तिसरा राज्यात पहिला क्रमांकाचे शहर अद्याप हागणदारीमुक्त नाही; प्रशासन अनभिज्ञ
नवी मुंबई अद्याप हगणदारीमुक्त नाही

नवी मुंबई हागणदारी मुक्त झाल्याच्या वल्गना महानगरपालिका करीत असली तरी एमआयडीसीच्या अनेक भागात आजही उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र आहे. एमआयडीसीतील बोनसारी गावात आजही पुरुष आणि महिलांच्या वेगवेगळ्या हगणदारी असून सुमारे साडे चार हजार लोकवस्तीसाठी केवळ एक सार्वजनिक शौचालय आहे. ज्यात पाण्याची सोय नाही. विशेष म्हणजे या एकमेव शौचालयाचे पाणी थेट नाल्यात सोडण्यात आले आहे.

हेही वाचा- झाडे वाचवण्याऐवजी तोडण्यावरच अधिक भर; सानपाड्यात ३ विकासकामात ७२ % झाडे मुळासकट तोडण्याचे प्रस्तावित

स्वच्छ भारत अभियानात यावेळी नवी मुंबई समोर स्वच्छतेचे मोठे आव्हान असून असून अनेक त्रुटी समोर येत आहेत. बोनसारी या गावात घराघरात शौचालय योजना राबवली मात्र मलनिस्सारण वाहिनीच अद्याप टाकण्यात आली नाही. त्यात प्रत्येक घरासमोर शोष खड्डा केल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढतोच शिवाय पावसाळ्यात अजून विदारक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या शौचालयाचा वापार बहुतांश ठिकाणी बंद केला आहे. या ठिकाणी एकच शौचालय असून गावाच्या वेशी बाहेर हे शौचालय आहे. यात दहा पुरुष आणि दहा महिलांच्या साठी बैठे शौचालय आहे. मात्र लोकसंख्येचे प्रमाण पाहता हे तोकडे पडत असून रोज सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात रांगा लागतात. या शिवाय पाण्यासाठी या ठिकाणी काही वर्षापूर्वी कूपनलिका करण्यात आली मात्र त्याचा सुरवातीपासून वापर नसल्याची माहिती हे शौचालय सांभाळणाऱ्या व्यक्तीने दिली. काही दिवसापूर्वी या शौचालयाचे नुतनीकरणच्या नावाखाली केवळ रंग देण्यात आला. मात्र आतील फुटलेले भांडे, दोन शौचालय दरम्यान तुटलेले पत्रे, नादुरुस्त दरवाजा, दरवाजाला आतून कडी नसणे अशा दुरुस्ती न करता थेट केवळ रंग देण्यात आला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेले वंडर्स पार्क फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरु होणार?

या गावाचे ग्रामदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिर हे डोंगरात आहे. या ठिकाणी जाण्याचा रस्ता काहीसा निर्जन आहे. त्यामुळे हा रस्ता महिलांची हागणदारी म्हणून ओळखला जातो. याची ठिकाणी आम्हा महिलांना जावे लागत आहे. गावाप्रमाणे आम्ही एक तर सूर्य उगवण्यापूर्वीच्या अंधारात वा रात्री अंधार पडेपर्यत वाट पाहून जातो. अशी माहिती शांता वडमारे यांनी दिली. या समस्ये मुळे गावातील तरुणाची सोयरिक जुळत नसल्याची अडचण सुरज कांबळे या युवकाने सांगितली.

सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी नवीन शौचालय बनवण्यासाठी केलेल्या आंदोलन वेळी वर्गणी म्हणून १५० रुपयांचा डीडी देण्यात आल्याची रंजक माहितीही गावातील रमेश कोडोबा मोरे या नागरिकाने सांगितली. या बाबत अधिक माहिती देतानां बाळासाहेबांची शिवसेना शाखा प्रमुख विलास सुरेश घोरपडे यांनी सांगितले कि जेव्हा शौचालयाची डागडुजी न करता थेट रंग देत होते त्यावेळी काम थांबवून दिवसभरात जवळपास १२ फोन समन्धित अधिकार्याला केला मात्र प्रतिसाद दिलाच नाही. वाढती लोकसंख्या पाहता आहे ते शौचालयाची  डागडुजी करणे आणि थोड्या अंतरावर अजून दोन शौचालय बांधण्यासाठी अनेक आंदोलन धरणे झाली मात्र मात्र काहीही फरक पडला नाही. अशी माहितीही घोरपडे यांनी दिली.  

हेही वाचा- नवी मुंबईतील शिक्षित भागातही वीज चोरी

त्या ठिकाणी अजून दोन सार्वजनिक शौचालयाची गरज असूनऔद्योगिक विकास मंडळाकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. तसेच गाव हगणदारीमुक्त नसेल तर समंधीत सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाईचे आदेश दिले जातील, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.

एका सामाजिक संस्थेने स्वतः पुढाकार घेत रंग दिलेला आहे. मात्र त्यापूर्वी दुरुस्ती करणे आवश्यक होते. नेमका काय प्रकार आहे त्याची महिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त बाळासाहेब राजळे यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 09:28 IST

संबंधित बातम्या