|| संतोष जाधव
नवी मुंबई शहरातील अनेक वास्तूंची पालिकेच्या मालमत्ता विभागाकडे नोंदच नाही
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने नुकताच २९ वा वर्धापन दिन साजरा केला. मात्र इतक्या वर्षांत अनेक वास्तूंचे मालमत्ता विभागाकडे हस्तांतर व मूल्यांकनच झालेले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात सात वर्षांपूर्वी उभारलेल्या पालिकेच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. पालिकेतील मालमत्ता व अभियंता विभागाच्या समन्वयाअभावी हा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई महापालिका एक राज्यातील श्रीमंत महापालिका आहे. शहरात पालिकेने अनेक आकर्षक आणि देखण्या वास्तू उभारल्या आहेत. यात नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय ही इमारत तर शहराची ओळख झाली आहे. करोडो रुपये खर्चातून ही वास्तू उभारली आहे. १८ फेब्रुवारी २०१४ रोजी सात वर्षांपूर्वी या इमारतीचे उद्द्घाटन झाले असून तेव्हापासून पालिकेचा कारभार या इमारतीत सुरू आहे. मात्र हे पालिका मुख्यालयाची इमारतही अद्याप पालिकेच्या मालमत्ता विभागाकडे हस्तांतर झालेले नाही. पालिकेची मालमत्ता ही संबंधित विभागाकडे हस्तांतर होणे बंधनकारक आहे. यात शाळा, समाज मंदिरे, मंगल कार्यालये, विभाग कार्यालये, मोरबे धरण, स्माशनभूमी, मैदाने, उद्याने तसेच विरंगुळा केंद्र अशा अनेक वास्तू वा प्रकल्प पालिकेने उभारले आहेत.
यासाठी एमआयडीसी व सिडकोकडून ६१९ भूखंड पालिकेला मिळाले आहेत. मात्र पालिकेकडे फक्त हस्तांतर झालेल्या २५८ वास्तूंचीच माहिती उपलब्ध आहे. या दोन विभागांच्या या गोंधळामुळे शहरातील किती मालमत्ता विकसित झाल्या आहेत याची माहिती पालिकेकडे मिळत नाही. अभियंता विभागाने वास्तू उभारल्यानंतर ती वास्तू रीतसर मालमत्ता विभागाला हस्तांतर न झाल्याने ही माहिती मिळत नाही.
शहरात आशाप्रकारे अनेक मालमत्तांचे हस्तांतर झाले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. एकूणच मालमत्ता व त्यांचे मूल्यांकन याबाबतच गेली काही वर्षांपासून हा सावळागोंधळ सुरू आहे. गेल्या २९ वर्षांतील हा हलगर्जीपणा पालिकेला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे.
समन्वयाचा फटका
मालमत्ता व अभियंता विभागाकडे याबाबत विचारणा केली असता या दोन विभागांत समन्वय नसल्याचे दिसून येते. अभियंता विभागाने पालिका मुख्यालयाची इमारत पूर्ण झाल्यानंतर मालमत्ता विभागाकडे हस्तांतरासाठी प्रक्रिया केली होती. परंतु त्यांनी काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली होती असे सांगितले तर मालमत्ता विभागाने अद्याप महापालिका मुख्यालयाची वास्तू मालमत्ता विभागकडे हस्तांतर झाली नसल्याचे सांगितले.
दोन संस्थांची नियुक्ती याबाबत पालिकेने दोन संस्थांची नेमणूक केली असून एक संस्था मालमत्तांच्या क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करणार आहे. तर दुसरी मालमत्तांचे मूल्यांकन निश्चित करणार आहे.
महापालिका मुख्यालयाची वास्तू मालमत्ता विभागाकडे नियमाप्रमाणे हस्तांतर होणे आवश्यक असून शहरातील सर्व मालमत्ता व हस्तांतराबाबत संबंधित दोन्ही विभागांकडून माहिती घेण्यात येईल. तसेच एक विशेष बैठक आयोजित करून मालमत्ता हस्तांतराबाबतच्या अडचणी जाणून घेऊन योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात येईल. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
हस्तांतर झालेल्या वास्तू
- बेलापूर : ३८
- नेरुळ : ५१
- वाशी : १५
- तुर्भे सानपाडा : ३७
- कोपरखैरणे : ५२
- घणसोली : २३
- ऐरोली : ३३
- दिघा : ०९
- एकूण : २५८
