नवी मुंबई  : नेरुळ सेक्टर-६ मधील सुश्रुषा रुग्णालयाच्या तळघरात सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता अचानक लागलेल्या आगीने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तळघरातील एसी यंत्रणेतून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आग लागल्यानंतर रुग्णालयाच्या तळघरातून मोठ्या प्रमाणात धूर वरच्या मजल्यांवर पसरला. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्व २१ रुग्णांना शेजारील स्वामीनारायण मंदिरात सुरक्षित हलवले. त्यावेळी रुग्णालयात ४२ कर्मचारीही उपस्थित होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाशी आणि नेरुळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दलाने बचावकार्य राबवून आग आटोक्यात आणली. नंतर २१ पैकी २० रुग्णांना हॉस्पिटलच्या पनवेल शाखेत तर एका रुग्णाला वाशीतील फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आले.

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे वाशी अग्निशमन अधिकारी गजेंद्र सुसविरकर यांनी सांगितले आहे.