Maratha Reservation Protest: पनवेल – मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह उपनगरातून आणि रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मराठा समाजातील तरूणांच्या बैठकांची सत्र सुरू झाली आहेत.  गेल्या चार दिवसात खोपोली, चौक आणि पनवेलशहरा, वांगणी गावासह कळंबोली, खांदेश्वर, खारघर आणि कामोठे या सिडको वसाहतींमध्ये बैठका घेऊन २९ ऑगस्टरोजी मुंबई येथील आझाद मैदानामधील आंदोलनात सामिल होण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.  

गणेशोत्सवात मुंबई येथील आझाद मैदानामध्ये होत असलेल्या आंदोलनात सामिल होताना खासगी वाहनांएेवजी सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करण्याचे बैठकीत सांगण्यात आले तसेच आंदोलनाला येताना चोरट्यांपासून वाचण्यासाठी सोने आणि मौल्यवान दागीने घालण्याचे टाळा अशी सूचना मराठा समाजाच्यावतीने पनवेलमध्ये करण्यात आली. 

खोपोली येथील चंद्रविलास सभागृहात सोमवारी सूनील पाटील, शंकर थोरवे, किरण हडप, केतन निकम, संकेत हडप यांच्या उपस्थित बैठक पार पडल्याचे सकल मराठा समाज समन्वयक विनोद साबळे यांनी सांगीतले. तसेच पनवेलमध्ये रामदास शेवाळे, राजेश्री कदम, संतोष जाधव, स्वप्नील काटकर, गणेश कडू, सूरेश घरत यांच्या सोबत असंख्य मराठा बांधव आंदोलनात सामिल होण्यासाठी संघटीत होत असल्याचे साबळे यांनी सांगीतले.

कोणत्या मार्गाने जरांगे यांचा वाहनताफा येणार…

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजातील तरूण व तरूणी एकवटत आहेत. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली, दांडफाटा, खालापूर आणि पनवेलच्या पळस्पे जेएनपीटी महामार्गावर टी पॉईंट येथे मराठा बांधवांनी तयारी केली आहे. जरांगे यांच्यासह असंख्या मराठा बांधवांचा वाहनताफा २७ ऑगस्ट रोजी ( गुरुवारी) आंतरवाली येथून निघणार आहेत. शुक्रवारी ते शिवनेरी येथे पोहचतील. जुन्नर येथून ते खेड, चाकण,तळेगाव त्यानंतर लोणावळा आणि पनवेल येथून नवी मुंबईतील वाशी त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात दाखल होणार आहे   

गेल्या वेळी मनोज जरांगे यांचा वाहनथांबा मुंबईत पोहचण्यापूर्वी वाशी येथील एपीएमसी बाजाराच्या जागेवर थांबवण्यात आला होता. याच ठिकाणी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांची भेट झाली होती. यावेळी गणेशोत्सव असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जरांगे यांच्यासह असंख्य जरांगे समर्थक मुंबईपर्यंत पोहचून कोंडी होऊ नयेत यासाठी पोलिसांना अद्याप तरी सरकारकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याने पोलिसांकडून कोणतीही पूर्वतयारीचे नियोजन दिसत नाही.    

जरांगे यांनी आझाद मैदानात उपोषणाच्या घेतलेल्या पवित्र्याला मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा तरूणांकडून जास्तीत जास्त पाठिंबा मिळविण्यासाठी मराठा समाजाने मराठा समाजातील कुटूंबियांपर्यंत समाजमाध्यमांतून आवाहन कऱण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात पुकारलेल्या या उपोषणाला किती पाठिंबा मिळतो यावर हे आंदोलन थांबवावे की नाही याबाबत सरकारची दिशा ठरेल असेही सांगीतले जाते. 

“मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा ठाम पाठिंबा आहे. आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी मराठा समाज एकदिलाने रस्त्यावर उतरेल. येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल.”- विनोद साबळे, समन्वयक, सकल मराठा समाज ,कळंबोली, खांदेश्वर वांगणी, खारघर कामोठे