सिडकोकडून आणखी काही कामांची पूर्तता शिल्लक
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील जाहीर सभेत जाहीर केल्याप्रमाणे डिसेंबरअखेर धावणारी नवी मुंबई मेट्रोला आता पुढच्या वर्षीचा मुहूर्त लाभण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेलापूर ते पेन्धर या ११ किलोमीटर अंतरावर वर्षअखेर सुरू होणारी मेट्रो आता पुढील वर्षी धावणार असल्याचे समजते.
या मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्गाची चाचणीही घेण्यात आली होती. त्यामुळे ही मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू होणार, अशी आशा नवी मुंबईकरांना लागली असताना विमानतळाबरोबर या प्रकल्पालाही विलंब लागणार असल्याचे समजते.
मुंबईत मेट्रो प्रकल्पाची कामे जोरात सुरू असताना सिडकोने ऑगस्ट २०११ रोजी सुरु केलेला मेट्रो प्रकल्प गेली आठ वर्षे रखडला आहे. नवी मुंबईतील मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी सिडकोने पाच मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बेलापूर ते पेन्धर (तळोजा ) या ११ किलोमीटर मार्गाचे काम २०११ रोजी आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आले आहे. कंत्राटदारांच्या चालढकलपणामुळे हा प्रकल्प गेली आठ वर्षे रखडला आहे.
याशिवाय सिडकोने या मार्गाचे विस्तारीकरण करताना तो कळंबोली, खांदेश्वर आणि नवी मुंबई विमानतळ असा २५ किलोमीटपर्यंतचे अंतर वाढवले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अलीकडे मेट्रोची ही कामे वेगवेगळ्या कंत्राटदारामध्ये विभागून दिली आहेत. यापूर्वी ती एकाच कंत्राटदाराकडे असल्याने हा प्रकल्पाला खीळ बसली होती. या मार्गावर मागील माहिन्यात सिडकोने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक चाचणी पूर्ण केली. त्यासाठी चीनवरून आणण्यात आलेले डबे (कोच) वापरण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीच्या आधी हा चाचणीचा बार उडवून लावण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ातील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या जाहीर सभेत लवकर या उपनगरात मेट्रो सुरू होणार असल्याचे जाहीर केले. सिडकोने रखडलेला हा प्रकल्प डिसेंबरमध्ये सुरू करणार असल्याचे गेल्या वर्षीच जाहीर केले आहे. त्याचीच री पंतप्रधानांनी ओढली होती. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
सिडकोच्या मेट्रो मार्गाचे काम प्रगती पथवार आहे. काही दिवसांपूर्वी या मार्गावर मेट्रोची चाचणीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. सिडकोने या कामाला गती दिली आहे, मात्र येत्या दोन महिन्यांत हा मार्ग सुरु होण्याची शक्यता नाही. त्याला आणखी थोडा वेळ लागणार आहे.
-एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको