नवी मुंबई महापालिकेच्या जलपुरवठा धोरणावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. खारघर आणि कळंबोलीला पाणी कोणाच्या सांगण्यावरून दिले गेले ? याबाबत महासभेला काहीही माहिती नाही. मग हा अधिकार आयुक्तांनी स्वत:हून का वापरला ?” असा थेट सवाल नवी मुंबई भाजप नेते गणेश नाईक यांनी अलीकडील जलपूजन समारंभात उपस्थित केला.
नवी मुंबईकडे सुमारे साडेचारशे एमएलडी पाणी उपलब्ध आहे. मात्र खारघर आणि कामोठ्याला दिलेले पाणी कोणत्या अटींवर आणि शर्तींवर देण्यात आले, याबाबत लोकप्रतिनिधींना, जनसेवकांना विचारण्यात आले का ? आयुक्तांनी धरणाला स्वत:च्या मालकीचे समजून थेट पाणीपुरवठा सुरू केला असल्याचा आरोप नाईक यांनी केला.
नवी मुंबई महापालिकेच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेत असतो. यामध्ये पुन्हा एकदा नाईकांनी अनेक प्रश्न आयुक्तांना विचारत असल्याचे दिसून येत आहे. पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबतही नाईक यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. तलाव परिसरात अनेकजण वस्ती करून राहतात. या नागरिकांचा मलमूत्र थेट तलावाच्या पाण्यात मिसळतो. शास्त्रीय दृष्टीकोनातून हे धोकादायक आहे.
फील्टर प्लांटवर प्रक्रिया होत असली तरी मूळ पाणी दूषित असेल तर ते सुरक्षित कसे राहील?” असेही ते यावेळी म्हणाले. या प्रश्नावर बोलत असताना त्यांनी उदाहरण देत हे स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, “दाढी करण्याची वाटी जरी आगीवर तापवली तरी त्यातले पाणी कोणीही पिणार नाही. मग तलावाचे पाणी दूषित होत असताना निष्काळजीपणा कसा चालणार?” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थीत केला.
धरणांना कुंपण घाला
या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी नाईक यांनी केली. आसपासच्या गावांमध्ये नागरिकांचा मलमूत्र धरणाच्या पाण्यात येऊ नये यासाठी धरणाला तातडीने कुंपण उभारणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. “गोगलगायीच्या वेगाने काम होणार नाही. मी आज बोलतोय तर पुढच्या वर्षीपर्यंत काम पूर्ण झाले पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला. शहराच्या नागरिकांना दूषित पाणी पुरवणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे सांगून त्यांनी महापालिकेला याबाबत सजग होण्याचे आवाहन केले.
आयुक्तांना इशारा… शहराच्या संपत्तीबाबत मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप करीत नाईक म्हणाले की, “या शहराचे लोकप्रतिनिधी आणि जनसेवकांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. तुम्ही आज आहात, उद्या नसाल; पण आम्ही कायम इथे राहणारे आहोत. असा इशाराही त्यांनी आयुक्तांना केला.