पनवेल – मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी (ता. ७) केलेल्या दौ-यानंतर रायगड जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माहिती या रस्त्याचे काम ९० ते ९५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच गणेशोत्सवासाठी जाणा-या कोकणवासियांना रस्त्यातील खड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीत कमी त्रास व्हावा यासाठी हा दौरा केल्याची माहिती दिली. मंत्री भोसले यांनी गुरुवारी सकाळी पनवेल येथील पळस्पे फाटा येथून रत्नागिरी जिल्ह्यातील हातखांबा पर्यंत दौरा केला.

मंत्री भोसले यांनी दिलेल्या माहितीनूसार “महामार्गाचे सुमारे ९० ते ९५ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगताना,” कामात प्रगती न दाखविणा-या काही ठिकाणच्या कंत्राटदारांना बदलण्यात आले असून नैसर्गिक अडथळे तसेच महामार्गाच्या भूसंपादनातील तांत्रिक अडचणींमुळे कामांना विलंब झाल्याचे स्पष्ट केले. विशेषतः माणगाव आणि इंदापूर परिसरातील निविदा प्रक्रिया उशिरा झाल्याचे मंत्री भोसले यांनी मान्य करताना त्यामुळेच त्या परिसरातील कामांना थोडा वेळ लागणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. परंतू जेथे कंत्राटदार कंपनीमध्ये बदल केले आहेत तेथे सध्या नव्या कंत्राटदार कंपन्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.

“रेल्वे उड्डाणपुल, बायपास यांसारखी कामे अंतिम टप्प्यात आली असून उर्वरित अपूर्ण कामे देखील प्राधान्याने मार्गी लावण्यात येत असल्याचे मंत्री भोसले म्हणाले. चिखल या गावाजवळील वाहनांसाठी अंडरपास आणि सेवा रस्त्याची मागणी मान्य करून ती कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी आश्वासन दिले. यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. 

या दरम्यान, परशुराम घाटातील अपघातांच्या वाढत्या घटनांकडेही मंत्री भोसले यांनी लक्ष वेधले. “घाटातील दरड कोसळण्याचे प्रमाण आणि अपघातांमुळे या भागात नवीन वायरडक्टसाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुंबईहून कोकणाकडे जाण्यासाठी बांधणा-या  महामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून सूरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवात तरी या महामार्गाचा वापर करुन कोकणवासीय तळकोकणापर्यंत सूखद प्रवास करतील हे अपेक्षित होते. मात्र ९५ टक्के काम पूर्ण झालेल्या महामार्गाचे पुढील कामे २१ दिवसात कशी पूर्ण होतील याकडे कोकणात जाणारे चाकरमानी लक्ष्य देऊन आहेत.