पनवेल : उलवे येथे जन्मदात्या आईने स्वत:च्या नवजात अर्भकाला शौचालयात जन्म देऊन शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. या प्रकरणी पोलीसांनी संबंधित अविवाहित आईविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. उलवे येथील सेक्टर २१ मधील अदिनाथ अर्पण इमारतीमध्ये मध्यरात्री मीटरबॉक्सच्या पार्कींगमध्ये हे अर्भक पडले होते. रहिवाशांनी काय पडले हे पाहण्यासाठी गर्दी केली. पोलीस आले तरी इमारतीमध्ये कोणीही सांगायला तयार नव्हते. मात्र पोलीसांनी इमारतीमधील अनेक सदनिकांमध्ये चौकशी केल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले.

एनआरआय पोलीस ठाण्यात रात्री उशीरा रहिवाशांनी संपर्क साधून आदिनाथ अर्पन इमारतीमध्ये नवजात अर्भक सापडल्याची तक्रार केली. पोलीस पथक तेथे पोहचले. जखमी अर्भकाचे शव रुग्णवाहिकेतून वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात घेऊन गेल्यावर संबंधित अर्भकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. काही तासांपूर्वीच या अर्भकाचा जन्म झाल्याचे समजल्यावर एऩआरआय पोलीसांनी आदिनाथ अर्पन इमारतीमध्ये झाडाझडती सूरु केली. ज्या ठिकाणी मृत अर्भक सापडले त्यावरील शौचालयाच्या खिडक्या पाहिल्यानंतर सदनिका क्रमांक २०१ मधील खिडकीच्या काचा नसल्याचे समोर आले. पोलीसांनी सदनिकेत राहणाऱ्या यशवंत आडे यांच्या कुटूंबाची चौकशी केल्यावर या कुटूंबात तीन सदस्य असून आडे यांच्या गावाकडील दोन महिला नातेवाईक येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा >>> रिक्षात बसून नातवाची वाट पाहणाऱ्या आजीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सखोल चौकशी केल्यावर काही तासांपुर्वी आडे यांच्या घरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे या तरुणीला नेण्यासाठी रिक्षा आणण्यासाठी ते गेले असल्याचे पोलीसांना समजले. संबंधित १९ वर्षीय तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी नेरुळ येथील मासाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेल्यावर नूकतेच संबंधित तरुणीने बाळाला जन्म दिल्याचे स्पष्ट झाले. मामाच्या मुलासोबत शारीरिक संबंधातून हे बाळ जन्मले असल्याचे संबंधित तरुणीने पोलीस अधिका-यांना सांगीतले. गेले आठ महिने गरोदर असूनही तीचे पोट दिसत नसल्याने तीने गरोदरपणाची बाब नातेवाईकांपासून लपविल्याचे कबूल केले. आडे कुटूंबात ही तरुणी राहत होती. त्यांनीही संबंधित तरुणीला पोटदुखत असल्याने डॉक्टरांकडे नेले होते. डॉक्टरांनीही सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मात्र तोपर्यंत मध्यरात्रीच हा धक्कादायक प्रकार घडला. एनआरआय पोलीसांनी अर्भकाच्या खूनाचा संबंधित तरुणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.