नवी मुंबई : सातत्याने वाढणारी लोकसंख्या व शहरातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बेलापूर येथे नवी मुंबई महापालिकेचे बहुमजली पार्किंग अंतिम टप्प्यात असताना महापालिकेने शहरातील पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना म्हणून वाशी रेल्वेस्थानक तसेच बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ उपलब्ध भूखंडांवर पार्किंगची सुविधा निर्माण करण्याचे नियोजन केले आहे.
सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथे ६९० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर ३० ए, वाशी येथे हॉटेल तुंगासमोर ११ हजार ३०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत असून या दोन्ही वाहनतळांची जागा रेल्वे स्थानकांजवळ आहे. दोन्ही भूखंडांचे तत्परतेने सर्वेक्षण करून जलद कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी अभियंत्रिकी व मालमत्ता विभागांना दिले आहेत. या दोन भूखंडांवर नियोजित दोन्ही वाहनतळ शासन व खाजगी संस्था भागीदारी तत्वावर विकसित करण्याचे नियोजन आहे.
महापालिकेला प्राप्त झालेल्या वाशी व बेलापूर येथील भूखंडांवर पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आयुक्तांच्या आदेशाने करण्यात येत आहे. – अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता
हेही वाचा – नैना क्षेत्रात मेट्रोची धाव, सिडकोकडून सूचिबद्ध आराखड्यासाठी हालचाली सुरू
बेलापूरची पार्किंग सुविधा कधी?
नवी मुंबई महापालिकेने बेलापूर सेक्टर १५ येथे बहुमजली पार्किंग सुविधा तयार केली असून या बहुमजली वाहनतळ इमारतीत ४७६ चारचाकी तर १२१ दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा आहे.