बेलापूर आम्रमार्ग उड्डाणपुलाखालील गोठ्यांवर पालिकेची कारवाई, निद्रावस्थेतील अतिक्रमण विभागाला आली जाग
संतोष जाधव
नवी मुंबई- ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ३० मार्चच्या ‘शून्य कचरा दिना’चे औचित्य साधून इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे “स्वच्छोत्सव-२०२३” अंतर्गत विशेष कार्यशाळा संपन्न झाली.आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसानिमित्त कचरामुक्त शहरासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कचरामुक्त शहरासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या चर्चासत्रात सहभागी होत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शरहरातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना मांडल्या. तर दुसरीकडे सानपाडा उड्डाणपुलाखाली उभारलेल्या गेमिंग झोनेचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले होते व असे उपक्रम सर्व महापालिकांनी करावेत असे ट्विट केले होते.परंतू नवी मुंबईत दुसरीकडे शहरातील बेलापूर आम्रमार्ग उड्डाणपुलाखाली मात्र चक्क गायी म्हैशीचे गोठे थाटले असल्याचे चित्र समोर आणले होते. त्यामुळे निद्रावस्थेत असलेल्या अतिक्रमण विभागाला जाग आली व पालिकेने सलग दोन दिवस या उड्डाणपुलाखालील बेकायदा गायी म्हशींचे गोठ्यांवर कारवाई केली आहे.
नवी मुंबई महपालिकेने सानपाडा उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभिकरण करून तसेच त्याठिकाणी विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देऊन त्याचा कायापालट करुन नवी मुंबईतील सानपाडा उड्डाणपुलाखाली राबविलेल्या ‘गेमींग झोन’ या अभिनव उपक्रमाचे कौतुक सर्वत्र करण्यात आले होते. उड्डाणपुलाखालील अस्वच्छता दूर करून त्या मोकळ्या जागेत छोटेखानी क्रीडा संकुल उभे करण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आले आहे असताना दुसरीकडे आम्रमार्ग उड्डाणपुलाखाली गायी म्हैशींचे गोठे उभे राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणी बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी धडक कारवाई केली आहे. उरण फाट्यावरून पालिका मुख्या लयाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाखाली चक्क गायी म्हैशीचे गोठे बांधले होते. तसेच याठिकाणी चक्क उड्डाणपुलाखाली पुलाचा आधार घेत भिंती बांधून गोठे तयार केले होते. त्यामुळे या उड्डाणपुलाखालील परिसर हा गायी म्हशींच्या गोठ्यांनी अडवला होता. याच ठिकाणी गायी म्हणशींना बांधण्यासाठी केलेल्या व्यवस्थेबरोबरच त्यांच्यासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गवताच्या गंजी लावल्या होत्या.या सर्वावर कारवाई करत येथून सर्व साहित्य व गोठे हलवण्याची कारवाई करण्यास आली आहे. पालिका अतिक्रमण विभागाच्या सुरक्षारक्षकांच्या साथीने ही कारवाई करण्यात आली आहे. याच परिसरात गायी म्हैशींचे शेण टाकण्यासाठी उकीरडे बनवले असून त्याची दुर्गंधीही सर्वत्र पसरत होती. याच बरोबर गोठ्यांच्या साथीने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ही कारवाई तात्पुरत्या स्वरुपात न राहता उड्डाणपुलाखालील जागा पूर्णतः मोकळ्या करणे आवश्यक आहेत
पालिका स्वच्छता अभियानाला गायी म्हशींच्या गोठ्यांच्या अस्वच्छतेची व बकालपणाची बाधा…
बेलापूर आम्रमार्ग उड्डाणपुलाखालील रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला हे बेकायदा गायी म्हशींचे गोठे उभारण्यात आले होते. याच गोठ्यांचा आधार घेत या उड्डाणपुलाखाली अनेक अनैतिक व्यवसय करण्यात येत असल्याने या परिसराला अस्वच्छेतेचे व बाकाल स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे पालिकेच्या स्वच्छता अभियानाला अडथळा निर्माण झाला होता.
आम्रमार्ग उड्डाणपुलाखाली गायी म्हैशींचे गोठे तयार केले असल्याचे पाहणीत समोर आल्यानंतर या ठिकाणी मागील दोन दिवस सातत्याने कारवाई करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या आधाराने विटांच्या भिंती बांधून गोठे बनवण्यात आले होते. व गवताच्या गंजी थाटल्या होत्या. आम्रमार्ग उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुला असलेल्या बेकायदा गोठ्यांवर पालाकेमार्फत कारवाई करण्यात आली आहे.-शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापुर विभाग