पनवेल – पनवेल महापालिकेमध्ये सोमवारी राष्ट्रीय क्षयरोग (टीबी) दूरीकरण कार्यक्रमाचा आढावा पालिका आयुक्तांनी घेऊन टीबी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी या बैठकीत महत्वाच्या सूचना वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. या सूचनांमध्ये टीबी रुग्णांना यापुढे आठवड्याऐवजी महिन्याची एकदाच औषधे महापालिकेच्या आरोग्य विभागाने द्याव्यात तसेच क्षयरोग रूग्णांपर्यंत महापालिकेचे आरोग्य विभाग लवकर पोहचण्यासाठी खाजगी रूग्णालयांनी तसेच थुंकी, रक्त व लघवी तपासणी करणा-या प्रयोगशाळा चालकांनी (लॅब) क्षयरोग रुग्ण तसेच संशयित रूग्णांची महापालिकेकडे नोंदणी करण्यासाठी संबंधित आस्थापनांना पत्राने तातडीने कळवा असा सूचना आयुक्तांनी केल्या.
पनवेलमध्ये महापालिकेच्यावतीने टीबी मुक्त भारत अभियानाची अमंलबजावणीसाठी सोमवारी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अति जोखीमग्रस्त क्षय रूग्णांना उपचाराखाली आणून क्षयरोग निमुर्लन करण्याच्या दृष्टीने विविध उपायांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी टीबी फोरमचे उपाध्यक्ष प्रसेनजित कारलेकर, सचिव मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, जागतिक आरोग्य संघटनेच्या ठाणे मंडळाच्या सल्लागार डॉ. ज्योती साळवे, माजी नगरसेवक डॉ.अरूण भगत, इंडीयन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गुणे, बालरोग तज्ज्ञ डॉ.जय भांडारकर, एमजीएम क्षयरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पोतदार, मधुमेह तज्ज्ञ डॉ. कीर्ती समुद्र, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, पालिका वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
पनवेल महापालिका क्षेत्रात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ८३५ क्षयरोग रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रातील ज्या लॅब व रुग्णालयांनी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे क्षयरोग रूग्णांची माहिती देत नाही अशा आस्थापनांना पत्राने त्यांची जबाबदारी कळविण्याची सूचना आयुक्त चितळे यांनी केली. पालिका क्षेत्रातील अति जोखमीच्या भागामध्ये (झोपडपट्टी, वीटभट्टी, कामांसाठी स्थलांतरित झालेले कामगार, बेघर, इतर सामाजिक गट, तुरुंग, वृद्धाश्रम, आश्रम शाळा, वस्तीगृह, बांधकाम स्थळावरील कामगार, औद्योगिक भागात) विभागनिहाय क्षयरोग शिबीराचे आयोजन पालिका यापूढे करणार आहे. संशयित रूग्ण स्वत:हून महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत उपचार घेऊ शकतात. या रूग्णांचा आरोग्य केंद्रामध्ये छातीचा एक्स रे व क्षयरोग चाचणी अर्थात ‘एनएएटी’ चाचणी करण्यात येते. तसेच क्षय रुग्णांना निक्षय पोषण योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये क्षय रुग्णांना उपचारादरम्यान दरमहा एक हजार रूपये दिले जातात. परंतू यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्षयरोग पर्यवेक्षक यांच्याकडे संबंधित रुग्णाची नोंदणी आणि त्यांच्या बँक खात्याची माहितीची नोंद करणे आवश्यक आहे