दर पंधरा दिवसांनी कृती पुस्तिका घरपोच देण्याचा प्रस्ताव; जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न
विकास महाडिक
नवी मुंबई : देशात करोना संकटाचा सामना करताना विद्यार्थ्यांना गेले वर्षभर शाळेपासून दूर ठेवण्यात आले असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून बहुतांशी शाळा प्रशासनांनी ऑनलाइन वर्ग सुरू केलेले आहेत पण केवळ तीन-चार तासांच्या ऑनलाइन वर्गानंतर विद्यार्थी मोकळे राहात असल्याने नवी मुंबई पालिकेने एक वेगळा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका शिक्षकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम सुरू केला जाणार असून पालिकेच्या सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांच्या दारात पालिकेचे शिक्षक कृती पुस्तिका घेऊन जाणार आहेत.
पंधरा दिवसांनी एकदा ही गुरू-शिष्य भेट होणार असून गुरुजी घरी येणार म्हणून विद्यार्थी आपला गृहपाठ या कृती पुस्तिकेत लिहून ठेवणार असून त्यावर विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन केले जाणार आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे आणखी काही काळ शाळा बंद ठेवाव्या लागणार असल्याने पालिकेने ही गुरुकुल पद्धत शोधून काढली आहे. त्यावर सध्या चर्चा सुरू असून हा उपक्रम लवकरच राबविला जाण्याची शक्यता पालिका प्रशासनाला वाटत आहे.
नवी मुंबईत पालिका शाळांची स्थिती ही चांगली असून पटसंख्या दरवर्षी वाढत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात पालिका व जिल्हा परिषदेच्या काही शाळा पटसंख्येअभावी बंद होत असताना नवी मुबंईत मात्र ही संख्या वाढत आहे. पालिका शाळांतील पायाभूत सुविधा, पोषण आहार, शिक्षकांचा सहभाग, डिजिटल सुविधांचा वापर, प्रशासनाची मदत, या शैक्षणिक सुविधांबरोबरच शहरात असलेली रोजगाराची संधी, बांधकाम क्षेत्रातील प्रगती यामुळे नवी मुंबईत राहणाऱ्या गरीब गरजू नागरिकांची संख्या लक्षवेधी आहे. त्यामुळे पालिका शाळेत शिक्षण घेणारी विद्यार्थी संख्या जास्त असून केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू करणारी नवी मुबंई पालिका ही राज्यातील पहिली पालिका आहे. पालिकेच्या शाळेतील दहावीचे निकालदेखील दरवर्षी उत्तम गुणांकनाचे असल्याने पालिका प्रशासन पालिकेच्या या शाळांकडे बारकाईने लक्ष देत असून शाळांना मदत करताना हात आखडता घेतला जात नाही. त्यामुळेच करोनाकाळात अनेक शहरांतील शासकीय शाळा बंद असताना पालिकेने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या मोबाइलचा रिचार्जसाठी एक हजार रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहेत. याबरोबरच गेले वर्षेभर शाळांपासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा विचार करताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारात ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना विश्वासात घेणे महत्त्वाचे असून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. कृती पुस्तिका घेऊन शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दारात महिन्यातून एक ते दोन वेळा जाणार असून विद्यार्थ्यांने केलेला अभ्यास तपासणार आहे. शिक्षकांनी नेमून दिलेला अभ्यास या विद्यार्थ्यांने पूर्ण करावा यासाठी त्याला काही काळ दिला जाणार असून गुरुजी अभ्यास तपासण्यास पुन्हा येणार असल्याने विद्यार्थी हा अभ्यास कृती पुस्तिकेत करून ठेवतील असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाला वाटत आहे. या अभिनव उपक्रमासाठी पालिकेची सध्या चाचपणी सुरूअसून हा उपक्रम राज्याला आर्दशवत ठरण्याची शक्यता आहे.
सामाजिक संस्थांची मदत
नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागातील सुमारे ४२ हजार विद्यार्थी ७२ विविध पालिका शाळांमधून शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी एक हजारापर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे. त्यांच्या माध्यमातून व काही सामाजिक संस्थांच्या मदतीने पालिका ही कृती पुस्तिका तुमच्या दारात हा अभिनव उपक्रम राबवीत आहे.
मोकळा वेळ मिळत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष
पालिका शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यांना शिक्षणापासून जास्त काळ वंचित ठेवणे योग्य नाही. ऑनलाइन वर्गासाठी एक संगणक किंवा मोबाइलची आवश्यकता असून ही सुविधादेखील अनेक विद्यार्थ्यांकडे नाही. ऑनलाइन विद्यार्थी हा अभ्यास तीन ते चार तास करीत असून इतर वेळ हा मोकळा मिळत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांना विश्वासात घेऊन कृती पुस्तिका घेऊन शिक्षक आपल्या दारात ही योजना राबविण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.