लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : गेली सात वर्षे केवळ आरक्षण टाकून जागा अडविण्याचे काम सिडकोने केले असून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे आता नैना पुरे झाले, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे. सिडकोने विकास आराखडा तयार करावा त्या पद्धतीने विकास करावा अशी भूमिका घेत विकास शुल्क माफ करावे ही मागणी केली आहे. यासंदर्भात नैना प्रकल्पग्रस्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून त्याचे नेतृत्व खासदार श्रीरंग बारणे करणार आहेत.

नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या २७२ गावांचा व गावाजवळील जमिनीचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने जानेवारी २०१३ रोजी नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) जाहीर केले आहे. सिडको या सर्व ६०० किलोमीटर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करणार आणि त्याप्रमाणेच या भागाचा विकास झाला पाहिजे असा यामागचा उद्देश आहे. त्यानुसार सिडकोने २३ गावांचा एक आराखडा तयार केला असून त्याच्या नियोजनाचे काम सुरू आहे. या सर्व गावांतील शेतकऱ्यांसाठी सिडकोने एक योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांची चाळीस टक्के जमीन सिडकोला दिल्यास सिडको त्यांना सर्व पायाभूत सुविधा देईल. सिडको शेतकऱ्यांची ६० टक्के जमीन घेऊन त्या बदल्यात त्यांना पावणेदोन वाढीव एफएसआय देण्यास तयार आहे. शेतकऱ्यांनी सिडकोच्या या योजनेला विरोध केला असून आता सिडकोला शेतकरी चाळीस टक्के जमीन देण्यास तयार आहेत. या शेतकऱ्यांसाठी सिडकोने पन्नास पन्नास टक्क्यांचा गुजरात पॅर्टनदेखील देण्याची तयारी सुरू केली असून त्याचा अभ्यास सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी आता वेगळीच अट सिडकोसमोर ठेवली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी जमीन सिडकोला देण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र सिडकोने विकास शुल्काच्या नावाखाली तीन हजार चौरस मीटर दराने शंभर मीटरच्या भूखंडाला तीन लाख रुपये आकारले आहेत. हे शुल्क माफ करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागण्या घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली ११ जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

राजकीय खेळी

पनवेल, उरणमधील दोन्ही आमदार हे भाजपचे आहेत. उरणचे आमदार अपक्ष असले तरी ते भाजप बंडखोर असल्याने शिवसेनेला या दोन्ही मतदारसंघांत मुसंडी मारावयची आहे. त्यासाठी नैनामधील मागण्या हा एक ज्वलंत विषय असून त्यावर शिवसेना या मतदारसंघातील सर्व प्रकल्पग्रस्त मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न करीत आहे. नैनाच्या विरोधात गावोगावी सुरू असलेल्या बैठकांना आता जोर आला असून विहिघरच्या बैठकीसाठी खासदार बारणे यांनी हजेरी लावून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.