नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन जून महिन्यात होईल, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी जाहीर केले. विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयए) काम वेगात सुरू असल्याबाबत अदानी यांनी समाधान व्यक्त केले. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे कार्यकारी मुख्य अभियंता कॅप्टन बी.व्ही.जे.के. शर्मा, एनएमआयए प्रकल्पातील भागीदार कंपन्या आणि अन्य हितसंबंधी संस्थांचे प्रतिनिधी तसेच डॉ. प्रीती अदानी, जीत अदानी, दिवा अदानी यावेळी उपस्थित होते. विमानतळामुळे नवी मुंबईचा औद्याोगिक आणि आर्थिक विकास होणार असून विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण परिसराला मोठी आर्थिक चालना मिळेल, असा विश्वास अदानी यांनी व्यक्त केला. विमानतळाची पाहणी केल्यानंतर ‘एक्स’ समाजमाध्यमावर त्यांनी जूनमध्ये विमानतळ सुरू होईल, असे स्पष्ट केले. या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्घाटन दोन महिने लांबणीवर?

‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी १७ एप्रिलला विमानतळातून देशांतर्गत वाहतूक सुरू होईल, अशी घोषणा पूर्वी केली होती. त्यानंतर आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिलअखेरचा मुहूर्त दिला होता. मात्र अदानी यांच्या रविवारच्या दौऱ्यानंतर आता विमानतळाचे उद्घाटन दोन महिने लांबणीवर गेल्याचे मानले जात आहे.