नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्धाटन होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामुंबईतील मोठया प्रकल्पांवर भाजपसह आपल्या पक्षाची छाप उमटविण्याचा प्रयत्न करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची साद दिली खरी मात्र विमानतळासह मेट्रो प्रकल्पाच्या उद्धाटन सोहळ्यावर ‘कमळाची’च छाप उमटेल असे पद्धतशीर प्रयत्न झाल्याचे यावेळी पहायला मिळाले.

उद्धाटन सोहळ्याच्या प्रवेशद्वारापासून अगदी व्यासपिठापर्यत जागोजागी उमटविण्यात आलेले कमळाचे प्रतिबिंब, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाच्या आरेखनात कमळ पुष्पाचा उल्लेख करत समृद्धी, संस्कृतीशी जोडलेले त्याचे नाते आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना व्यासपिठावर दिले गेलेले विशेष स्थान यावेळी विशेष चर्चेत राहीले.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान उभारण्यात आलेल्या ’अटल सेतू’चा शुभारंभ सोहळाही नवी मुंबई विमानतळ प्रकल्पालगत असलेल्या मैदानावरच आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा आयोजित करत असताना तेव्हा मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण चमूने महत्वाची निर्णायक भूमीका बजावली होती. अयोध्येतील श्री राम मंदिराचा शुभारंभ सोहळाही याच काळात पुर्णत्वास आला होता. त्यामुळे अटल सेतूच्या शुभारंभ सोहळ्यावर राम मंदिर शुभारंभाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता.

लोकसभा निवडणुकांना सामोरे जात असताना नरेंद्र मोदी यांच्यासाठीचा प्रचार सोहळा वाटावा अशापद्धतीने या शासकीय कार्यक्रमाचे आयोजन तेव्हा करण्यात आले होते. जागोजाही उभारण्यात आलेल्या श्री रामाच्या प्रतिमा, मैदानातून रथावर आरुढ होऊन आलेले नरेंद्र मोदी आणि या रथाचे सारथ्य करणारे एकनाथ शिंदे असा सगळा माहोल यानिमीत्ताने उभा केला गेला होता. या सोहळ्यावर मोदींचा प्रभाव असणे स्वाभाविक असले तरी आयोजनात एकनाथ शिंदे यांची भूमीका महत्वाची होती. या सोहळ्याला वर्ष उलटत असताना बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या विमानतळ शुभारंभ कार्यक्रमात मात्र ‘कमळा’ची आणि पुर्णपणे भाजपची छाप राहील अशाच पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्यासपिठावर

नवी मुंबई विमानतळाचे आरेखन कमळ पुष्पासारखे असल्याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनीच आपल्या भाषणात केला. प्रकल्पाच्या उद्धाटनाच्या आधीपासूनच यासंबंधीची मांडणी सातत्याने केली जात होती. शुभारंभ सोहळ्यालाही जागोजागी कमळाचे प्रतिबिंब दिसेल अशा पद्धतीची आखणी करण्यात आली होती. प्रवेशद्वारापासून व्यासपिठापर्यत ‘कमळ’ लक्ष वेधून घेणारे ठरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या आरेखनाचे आपल्या भाषणात कौतूक केले. पंतप्रधानांनी तर ‘कमळा’चा संबंध थेट समृद्धी आणि संस्कृतीशी जोडला. यावेळी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांना व्यासपिठावर स्थान दिले गेले होते.

मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण विशेष निमंत्रीत म्हणून व्यासपिठावर होते. शिंदे यांनी आपल्या भाषणात महामुंबईतील रखडलेले प्रकल्प ‘महायुतीने’ मार्गी लावल्याचा उल्लेख केला. तसेच आगामी निवडणुकीत महायुतीच विजयी होईल असेही ते म्हणाले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र महायुतीचा उल्लेख केला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचा प्रवास स्पष्ट करताना सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरीक्त सचिव पदी कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांचा नावासह उल्लेख केला हे विशेष.