Navi Mumbai International Airport: नवी मुंबई: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाट्न झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला एअर इंडिया एक्सप्रेस या विमानतळावरुन दररोज पाच मेट्रो शहरांसाठी उड्डाणं सुरू करणार असल्याची चर्चा आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभ सुरुवातीला ३० सप्टेंबर रोजी होणार अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे विमानतळाच्या शुभारंभची तारीख बदलण्यात आली आणि अखेर ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण झाले असले तरी प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे हे विमानतळ सुरु झाले नव्हते. त्यासाठी एक ते दोन महिन्याचा कालावधी जाईल अशी चर्चा होती. अखेर आता नवी मुंबई विमानतळ संदर्भात नवी अपडेट समोर येत आहे. लवकरचं हे विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होणार असून सुरुवातीला एअर इंडिया एक्सप्रेस या विमानतळावरुन दररोज पाच मेट्रो शहरांसाठी उड्डाणं सुरू करणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच शहरांसाठी नवी मुंबईहून थेट विमान उपलब्ध होणार आहेत. याबरोबर पहिल्या टप्प्यात १५ हून अधिक शहरांसाठी दररोज २० उड्डाणे सुरु केले जातील. २०२६ पर्यंत विमानसेवेत वाढ करीत ५५ पर्यंत करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असणार आहे असे म्हटले जातं आहे.

एअर इंडिया एक्सप्रेससह इंडिगो आणि अक्सा एअर या कंपन्या देखील नवी मुंबई विमानतळावरुन उड्डाण सुरु करणार आहेत. इंडिगोचा ३६ देशांतर्गत विमान उड्डाणं करण्याचे नियोजन आखले आहे. एका दिवसात १५ शहरामध्ये विमान सेवा सुरू करण्याच्या विचारात असलेल्या इंडिगोने मोठा बदल केला आहे. यापुढे इंडिगो दररोज १५८ विमान सेवा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १४ आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण नवी मुंबई विमानतळावरुन होणार आहे. तर दुसरीकडे अक्सा एअर लाइनकडूम दररोज ४० विमानसेवा सुरू करण्यात येणार असून यातील ८-१० विमानं आतंरराष्ट्रीय असणार आहेत.