नवी मुंबई : सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वाधिक पॅकेज देऊन त्यांचे पुनर्वसन केले. यामुळे पूर्वी ज्या चार गावांनी या विमानतळाला विरोध केला त्या चार गावातील शेतक-यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जमिनीसह घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी सरकारकडे केल्यामुळे राज्य सरकार या चार गावांतील कुटूंबियांचे पूनर्वसन करुन त्या जागेवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भविष्यातील तिसरी धावपट्टी बांधण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नवी मुंबई येथे दिली.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी शनिवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आ. प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, महेश बालदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, गणेश देशमुख, डॉ. राजा दयानिधी व इतर अधिकारी उपस्थित होते. विमानतळ कामाच्या पाहणीनंतर अधिका-यांकडून घेतलेल्या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांनी या विमानतळातून पहिले विमान सप्टेंबर अखेरपर्यंत उडणार असे यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
या विमानतळाच्या पहिल्या टप्याचे काम ९४ टक्के पूर्ण झाले असून दररोज १३ हजार कर्मचारी या विमानतळाचे काम पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र झटत असल्याने अदानी समुह आणि सिडको महामंडळाने दुप्पट मजूर लावून हे पुढील ८० दिवसात विमानतळाचे काम पुर्ण करावे अशाही सूचना यावेळी अदानी समुहाच्या अधिका-यांना दिल्या. विमानतळाच्या पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या विमानतळाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री त्यांची वेळ घेणार असल्याचे त्यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. विमानतळाचे काम पुर्ण झाल्यावर सुद्धा विमानतळ संचलन आणि उड्डाणासंबंधी विविध परवानग्या घेण्याची प्रक्रिया करावी लागते.
तसेच या विमानतळ प्रकल्पाचे इंटेरीयरचे काम अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगभऱातील सर्वच विमानतळांच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळातील प्रवाशांची विमानापर्यंत बॅग पोहचविणारी व्यवस्था सर्वाधिक वेगवान व सूरक्षित आणि स्वंयचलित पद्धतीची असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. विमानतळ प्रकल्पातील बोर्डींग पासची यंत्रणा पूर्ण झाल्याने विमानतळ व्यवस्थापनाने यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांना विमानतळातील बोर्डींग पास रंगित तालिम म्हणून काढून दाखविला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामध्ये दोन धावपट्टीचे नियोजन होते. त्यामधील पहिली ३७०० मीटर लांबीची एक धावपट्टी बांधून तयार आहे. या पहिल्या धावपट्टीची वेगवेगळी चाचणी व परीक्षण घेऊन तीच्यावर विमानांचे यशस्वी उड्डाणाचा सराव घेण्यात आला आहे. दूस-या धावपट्टीचे काम काही प्रमाणात सुरू आहे. २०२७ पर्यंत दूसरी धावपट्टीचे काम पुर्ण करण्यासाठी सिडको मंडळ आणि अदानी समुहाने कंबर कसली आहे.
मुख्यमंत्र्यांनी अंतिम टप्यात याच विमानतळातील तिसरी धावपट्टी बांधण्याचे संकेत शनिवारी दिल्यामुळे मागील अनेक वर्षात विमानतळ गाभा क्षेत्रालगतच्या पारगाव, दापोली, खालचे ओवळे, भंगारपाडा, कुंडेवहाळ या गावातील गावक-यांना दिलासा मिळणार आहे. विमानतळाच्या नूकसान भरपाईच्या पुनर्वसन पॅकेजमध्ये या गावांतील कुटूंबांना साडेबावीस टक्के विकसित भूखंडासोबत घरासह इतर जागेची नूकसान भरपाई मिळणार आहे.
मागील अनेक वर्षे ही नूकसान भरपाई मिळावी यासाठी लोकनेते दि बा पाटील २७ गाव संघर्ष समिती वारंवार सिडको व सरकारकडे निवेदन देत असल्याची माहिती या समितीचे कार्याध्यक्ष सचिन केणी यांनी सांगीतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी तीस-या धावपट्टीसाठी चार गावांचे संपादन करण्याचे संकेत दिल्याने समितीचे कार्याध्यक्ष सचिन केणी यांनी समाधान मानले आहे.