नवी मुंबई : केंद्र शासनाने वर्धक मात्रा मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यासाठी तयारी केली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसह २३ नागरी आरोग्य केंद्रात शुक्रवारपासून ही लस देण्यात येणार आहे.

ही वर्धक मात्रा १८ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने या वयोगटातील दोन्ही लसमात्रांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण केलेले आहे. आता शुक्रवारपासून वर्धक मात्रा देण्यात येईल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. नवी मुंबई शहरात करोना नियंत्रणासाठी दिवसाला ५ हजार चाचण्या करण्यात येत आहे. चाचण्यांची संख्या थोडीशी कमी करून येथील कर्मचारी वर्धक मात्रा देण्यासाठी वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.