नवी मुंबई: नवी मुंबईत चिटफंड घोटाळा समोर आला असून गुंतवणूक रकमेवर ९ % व्याज देण्याचे आमिष दाखवून ३६ जणांची १ कोटी ४८ लाख ५० हजार ९६० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेली रक्कम आणि फिर्यादी यांची संख्या वाढू शकते अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या इच्छेने अनेकदा आमिषाला लोक बळी पडत असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे. वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक चॅनल्स वरील बातम्या , समाज माध्यमातून दिली जाणारी माहिती आणि पोलिसांनी वेळोवेळी केलेले आवाहन या सर्वाकडे दुर्लक्ष करीत अनेक जण अशा ठिकाणी गुंतवणूक करतात आणि शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असाच प्रकार नवी मुंबईतील ऐरोली येथे समोर आला आहे.
सुप्रिया पवार उर्फ सुप्रिया मेहेर, सागर मेहेर, सुभाष पवार प्रशांत पवार नीतिम पवार आणि तृप्ती पवार यांनी मिळून चिटफंड कंपनी सुरु केली. यातील सुप्रिया पवार उर्फ सुप्रिया मेहेर यांनी अन्य संशयित आरोपींना हाताशी धरून हि कंपनी सुरु केली. या चिटफंड मध्ये कमीत कमी ५० हजार रुपयांची गुंतवणूक करा ४५ दिवसात ९ ते १२ % हमखास परतावा दिला जाईल असे आमिष दाखवले गेले. तशी जाहिरात बाजी केल्याने त्याला बळी पडून ३६ जणांनी त्यांच्या कडे गुंतवणूक केली. यात ५० हजार ते ५ लाख पर्यंत लोकांनी पैसे गुंतवले असून हि रक्कम १ कोटी ४८ लाख ५० हजार ९६० एवढी आहे. हा प्रकार २०२० पासून सुरु आहे.
या दरम्यान अनेकांनी त्यांच्या कडे पैसे गुंतवले आहेत. त्यातील रोहन कोल्हे यांनी फिर्याद दिली असून त्याची पडताळणी करून सोमवारी या प्रकरणी संशयित सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आता पर्यंत ३६ जणांनी तक्रार केली असेल तर त्यात नक्कीच वाढ होऊ शकते त्यामुळे या ठिकाणी पैसे गुंतवले असेल तर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भोसले तपास करीत आहेत.