संतोष सावंत

नवी मुंबई : सिडको महामंडळातील कारभारात कोणत्याही स्वरुपाचा गैरप्रकार होऊ नये आणि येथील अधिकारी-कर्मचारी लाचखोरीच्या विळख्यात सापडू नयेत यासाठी महामंडळाने काही वर्षांपूर्वी दक्षता पथक स्थापन केले आहे. या पथकाची जबाबदारी सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश मेंगडे यांच्याकडे आहे. सिडको अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एका स्नेहसंमेलनात बोलताना मेंगडे यांनी दोन वर्षांपूर्वी ‘लाच घेऊ नका, सिडकोला बदनाम करू नका’ असे जाहीर आवाहनही केले होते. असे असतानाही गेल्या वर्षभरात लाचखोरीची प्रकरणे सतत उघडकीस येऊ लागल्याने सिडकोचे दक्षता पथक नेमके करते तरी काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सिडकोच्या या दक्षता पथकाच्या प्रमुखांकडे सध्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या भूखंडावर झालेले अतिक्रमण पाडायचे आणि सिडकोला विकासासाठी ते मोकळे करून द्यायचे अशी ही प्रमुख जबाबदारी आहे. गेल्या वर्ष दोन वर्षात मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा बांधकामे पाडण्याचा धडाकाच सिडकोने लावला खरा मात्र काही ठरावीक बांधकामांवर कारवाई होत नसल्याची ओरडही सातत्याने होत असते.

नवी मुंबई महापालिका हद्दीत अनेक गावांमध्ये सिडकोच्या जमिनीवर अशी बांधकामे होत आहेत. उरण-पनवेल तालुक्यात तर बेकायदा कंटेनर यार्डच्या रांगाच उभ्या राहिल्या आहेत. या कंटेनर यार्डची अनधिकृत मालकी कोणाकडे आहे याविषयी अनेक गमतीदार किस्से सिडको वर्तुळातच सांगितले जातात. त्यामुळे दक्षता पथक अतिक्रमणांवर कारवाई करते मात्र काही ठरावीक जमिनीच मोकळ्या कशा होतात, याचे उत्तर मात्र कुणालाच सापडत नाही, असे एकंदर चित्र आहे.

दक्षता विभागाचे मुख्य काम काय ?

अंतर्गत भ्रष्टाचार आणि लाचखोरीला आळा घालण्यासाठी सिडकोने भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली दक्षता विभागाची स्थापना केली. सिडकोच्या दक्षता विभागाच्या प्रमुखपदी प्रज्ञा सरवदे यांची नेमणूक झाल्यानंतर या पदावरील व्यक्तीने नेमके काेणती दक्षता घ्यावी याविषयी सिडकोत सर्वप्रथम चर्चा करण्यात आली होती.

नागरिकांनी थेट सिडकोच्या लाचखोरी तसेच गैर कारभाराविषयी या विभागाकडे निवेदन देता येईल अशीही व्यवस्था करण्यात आली होती. सिडकोचा कारभार पारदर्शक व्हावा अशा पद्धतीची ही रचना तेव्हा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती. असे असताना दक्षता पथकाकडे नेमक्या किती तक्रारी आल्या आणि त्यावर कोणती कारवाई झाली याविषयी गेल्या काही वर्षांत एकंदर संभ्रमाचे चित्र आहे.

सिडकोच संजय मुखर्जी यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक पद असताना सिडकोच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि अग्निशमन विभागाची अतिरीक्त जबाबदारी या विभागाच्या प्रमुखावर सोपविण्यात आली. त्यानंतर तर दक्षता पथक गेले कुठे असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती सिडकोत निर्माण झाली आहे.