Navi Mumbai Metro 1 Service: नवी मुंबई – सिडको महामंडळाने सुरू केलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रवासाचा आतापर्यंत १ कोटी प्रवाशांना लाभ घेतला आहे. अवघ्या २० महिन्यात बेलापूर ते पेणधर या पल्यावर एक कोटी प्रवाशांनी प्रवास करून दळणवळणासाठी मेट्रोची भविष्यातील या परिसराला गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. १० ते ३० रुपयांमध्ये या मेट्रोतून प्रवाशांना प्रवास करत येतो. 

१७ नोव्हेंबर २०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले. त्यामुळे कोणताही मोठा कार्यक्रम न करता बेलापूर ते पेणधर या मार्गिकेवर ही सेवा सुरू करण्यात आली. मुंबईच्या तुलनेत या मेट्रोचे तिकीटदर अजून कमी करता यावे अशी मागणी येथील प्रवाशांकडून होत आहे. मात्र याच मागणीमुळे सिडकोने ३३ टक्के दर काही पल्यावर कमी करून नवीन तिकीटदर लागू केले. कामाच्या वेळेत मेट्रोची गती वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मेट्रो सेवेची गती परिक्षणाची चाचणी यशस्वी झाली असून अद्याप नवी मुंबई मेट्रोने गतिवाढ केली नाही. 

तळोजा नोड येथे सिडको मंडळाने हजारो घरांचे निर्माण केले आहे. मात्र येथील नोकरदारवर्गाला बेलापूर येथे जाण्यासाठी इको व्हॅनमधील शेअर प्रवास करणे, नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवा (एनएमएमटी) बससेवेतून प्रवास करणे असे पर्याय २०२३पर्यंत उपलब्ध होते. तीन आसनी रिक्षांतून प्रवास करणे या परिसरातील नागरिकांसाठी सर्वात खर्चिक व महागडा प्रवास ठरत होता.

त्यावेळेस सिडकोने मेट्रो प्रवासाचा पर्याय प्रवाशांना दिल्याने अवघ्या २० महिन्यात एक कोटी प्रवाशांना मेट्रोच्या उन्नत रुळांवरून गारेगार (वातानुकूलीत) डब्यातून तळोजा, खारघर येथील डोंगरातील हिरवळ पाहत प्रवास करण्याची संधी मिळाली. यामुळे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवीन पर्याय मिळाला. मात्र अजूनही नवी मुंबई मेट्रोचे जाळे विविध सिडको वसाहतींमध्ये पसरले नाही. त्यामुळे पेणधर ते तळोजा औद्योगिक क्षेत्रापर्यंत मेट्रोचा विस्तार अजून कागदावरच आहे.

तळोजा औद्योगिक परिसर ते खांदेश्वर (व्हाया कळंबोली) या मार्गिकेचा बनला असून त्याच्या अंमलबजावणीविषयी कार्यवाही सिडको मंडळाला करण्यात रस नाही. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पेणधर मेट्रो रेल्वे स्थानकापर्यंत हलक्या वाहनांनी पोहचण्यासाठी साधे रस्ते सुद्धा सिडको मंडळाने बनवले नाहीत. त्यामुळे या सेवेच्या लाभापासून हजारो प्रवासी वंचित राहीले आहेत.

सध्या फक्त तळोजा परिसरातील विविध गृहसंकुलांमध्ये राहणा-या प्रवाशांना बेलापूर येथे येजा करण्यासाठी मेट्रो सेवेचा लाभ होतो. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील हजारो प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी रस्ते तयार केल्यास पुढील १० महिन्यात औद्योगिक वसाहतीमधील कामगार आणि कारखानदारांसाठी या मेट्रोसेवेतून आधार मिळू शकेल. सध्या गर्दीच्या वेळी दर १०मिनिटांनी बेलापूर व तळोजा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांना मेट्रोच्या फेऱ्याउपलब्ध आहेत. तर उर्वरित वेळांमध्ये दर पंधरा मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध आहे.