नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ, सानपाडा, जुईनगर, तुर्भे, कोपरखैरणे, घनसोली, सीबीडी बेलापूर या रेल्वे स्टेशन येथील फेरीवाले, गाळाधारक, गर्दुले यांच्यावर सिडकोच्या सुरक्षा विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे निदान येत्या काही दिवसांत तरी स्टेशन परिसर मोकळा श्वास घेईल अशी अपेक्षा केली जात आहे.
नवी मुंबई परिसरातील रेल्वे स्टेशनवरील साफसफाई, स्टेशनच्या दोन्ही बाजूस असणारे अनधिकृत वाहनतळ, फेरीवाले, गर्दुले व इतर यांच्यावर सिडकोच्या सुरक्षा विभागाकडून कारवाई करुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोहिम राबवली गेली.
नवी मुंबईतील सुंदर आणि आकर्षक वास्तू म्हणून सिडको निर्मित सर्व रेल्वे स्टेशनं आहेत. विशेष म्हणजे सर्व रेल्वे स्टेशनंची रचना वेगवेगळी असून एके काळी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत होते मात्र गर्दी वाढली व चित्रीकरण बंद झाले. कालांतराने अनधिकृत फेरीवाल्यांमुळे बकाळ स्वरूप रेल्वे स्थानकांना आले होते. मात्र उशिरा का होईना सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम आयोजित करुन दिनांक २७ ते २४ जुलै दरम्यान नेरुळ, सानपाडा, जुईनगर, तुर्भे, कोपरखैरणे, घनसोली, सीबीडी बेलापूर या रेल्वे स्टेशनवर वावरत असणारे फेरीवाले, पादचारी पूलावरील फेरीवाले, गाळेधारक, रेल्वे स्टेशनच्या आजुबाजुस उभी करण्यात आलेली अनधिकृत वाहने, गर्दुले यांचेवर सिडको सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांचे मार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई केली व परिसर स्वच्छ करण्यात आला त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई परिसरातील रेल्वे स्टेशनवर फेरीवाले, गर्दुले, अनधिकृतपणे माल लावत असलेले गाळाधारक आढळून आल्यास सिडकोच्या http://www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईट वर कळविण्यात यावे असे आवाहन सिडकोने केले आहे.