नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गालगतचा डीपीएस तलाव फ्लेमिंगोसाठी ‘संरक्षित क्षेत्र ‘ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानंतर रविवारी (ता.२० ) नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी व नागरीकांनी विजयी मार्च काढत आनंदोत्सव साजरा केला. रविवारी डीपीएस तलाव येथील परिसरात मोठ्या संख्येने नागरीक व पर्यावरणप्रेमी आनंदोत्ससवात सहभागी झाले होते.
नवी मुंबईतील नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलाव संरक्षित करण्यासाठी वारंवार साखळी आंदोलन करत नवी मुंबईकर नागरीक व पर्यावरणप्रेमी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. गतवर्षी तलावात येणारे खाडीचे पाणी रोखल्याने तलावाच्या असव्च्छतेबाबत पर्यावरणप्रेमींनी सातत्याने आवाज उठवला होता. वनमंत्री गणेश नाईक यांनी गतवर्षी प्रत्यक्ष भेट देत सिडकोने तलावात येणाऱ्या आंतरभरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखला होता तो सुरु केला होता.त्यामुळे हा तलाव संरक्षित क्षेत्र करण्यासाठी नॅटकनेक्ट तसेच विविध संस्था व विविध पर्यावरणप्रेमी यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न व साखळी आंदोलने करण्यात आली होती.फ्लेमिंगो सिटी संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील पामबीच मार्गालगतच्या तलावात खाडीचे पाणी येत असल्याने सातत्याने येथे फ्लेमिंगोंचा वावर मोठ्याप्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच डीपीएस तलाव संरक्षित म्हणून घोषित केल्याने रविवारी नागरीकांनी तलावाजवळ एकत्र येत आनदोत्सव साजरा कर विजयी मार्च काढत आनंदोत्सव साजरा केला.
नवी मुंबईतील पामबीच मार्गानजिक जागांना करोडोंचा भाव असून या परिसरात कांदळवन नष्ट करुन भूखंड मिळवण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच एका व्यावसायिकाने १०० पेक्षा अधिक झाडे तसेच कांदळवन नष्ट केल्याचे पाहायला मिळाले होते.नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी संबोधले जात असताना नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरभर विविध चौकात फ्लेमिंगोच्या प्रतिकृती नागरीकांचे लक्ष वेधून घेतात.मात्र दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक पामबाच मार्गालगतच्या जागा रहिवाशी क्षेत्रासाठी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. त्यामुळे डीपीएस तलावाला संरक्षित क्षेत्र घोषित केल्याने पर्यावरणप्रेमींच आनंद पाहायला मिळाला.
चौकट- गणेश नाईक फ्लेमिंगो सिटीसाठी सतत आग्रही…
वनमंत्री गणेश नाईक यांनी या शहराला फ्लेमिंगोसिटी संबोधले जात असताना फ्लेमिंगोंच्या प्रतिकृतीपेक्षा त्या पक्षांचा अधिवास टिकावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. डीपीएस तलावाबाबत घेतलेला निर्णय हा सर्वात वेगवान व निसर्गप्रेमींसाठी आनंददायी निर्णय असून त्याचा आंनदोत्सव सर्व पर्यावरणप्रेमी व नवी मुंबईकर नागरीकांना आहे.
नेत्रा शिर्के ,माजी नगरसेविका,
डीपीएस तलाव हा संरक्षित क्षेत्र घोषित झाला यापाठीमार्गे नवी मुंबई शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी व नॅटकनेक्ट तसेच इतर संस्था यांचा हा विजय असून एनआरआय व इतरही फ्लेमिंगोचे अधिवास असलेले तलाव वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहोत. एनआरआय संकुलाच्या पाठीमागे फ्लेमिंगोंचा अधिवास असलेला व सिडकोचा गोल्फ कोर्स प्रकल्पही रद्द झाला आहे. बी.एन.कुमार संस्थापक,नॅटकनेक्ट फाऊंडेशन
पर्यावरणप्रेमी संस्थांचा विजय….
डीपीएससह या भागातील एनआरआय चाणाक्य तसेच इतर फ्लेमिंगोंचे असलेले अधिवास टिकवण्यासाठी नॅटकनेक्ट, एन्व्हायरमेंट प्रिढर्वेशन सोसायटी, सेव्ह फ्लेमिंगोज अॅन्ड मॅंग्रोव्हज फोरम ,खारघर हिल अॅन्ड वेटलॅन्ड ग्रुप अशा विविध संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत.या विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते , पर्यावरणप्रेमी नागरीक रविवारी डीपीएस तलावाशेजारी करण्यात आलेल्या आनंदोत्सवात सहभागी होते.