नवी मुंबई : नवी मुंबई शहरात १५२ कोटी रुपये खर्चातून १३९६ सीसीटीव्ही उभारण्यात आले होते. मात्र सततच्या खोदकामामुळे या यंत्रणेत अडचण निर्माण होत होते. मात्र आता यापैकी ९० टक्के म्हणजे सुमारे १२५० कॅमेरे सुरू आहेत. याच सीसीटीव्ही यंत्रणेचा अवघ़ड गुन्हे उकल करण्यासाठीही लाभ होत आहे.

नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले होते. महापालिकेने यासाठी तब्बल १५२ कोटी रुपये खर्च केले. अद्ययावत १५२४ हाय डेफिनेशन कॅमेरे, स्पीड डिटेक्शन कॅमेरे, ट्राफिक कॅमेरे आणि एव्हीडेन्स कॅमेरे बसवण्याची निविदा २०२२ मध्ये मे. टाटा ग्रुपला दिलेली होती. परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर पालिकेतील कार्यपद्धतीमुळे टाटासारख्या विश्वासार्ह कंपनीला देखील तब्बल तीन वर्षानंतर आपला प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्यात अपयश येत होते. परंतु डॉ. कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी नंतर याविषयी सतत पाठपुरावा केला. परिणामी आता शहरात ९० टक्के सीसीटीव्ही कार्यरत आहेत. सध्या शहरात १५२४ पैकी १३९६ कॅमेरे बसवण्यात आले असून त्यातील १२५० कॅमेरे सुरु आहेत.

शहरातील १५ लाखांहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. पालिका मुख्यालयात सीसीटीव्ही नियंत्रणाचा मोठा कक्ष आहे. पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन यांच्यातील चांगल्या समन्वयातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होत आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालयातही सीसीटीव्ही तपासणी केली जाते.

नवी मुंबई शहरात सुरुवातीला सीसीटीव्ही यंत्रणेबाबत काही तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु आता शहरात जवळजवळ ९० टक्क्यापर्यंत म्हणजेच १२५० सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. त्यामुळे ठेक्याबाबतच्या विलंबाबाबतची आर्थिक प्रक्रियाही पूर्ण करण्यात येत आहे. – शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई शहरात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गुन्हे उकल करण्यासाठी चांगला उपयोग होत आहे. – पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ १

सीसीटीव्हीची नजर

कार्यादेशातीली सीसीटीव्ही – १५२४

प्रत्यक्षात लावलेले सीसीटीव्ही – १३९६

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्यक्षात कार्यरत कॅमेरे – १२५०