नवी मुंबई : ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात बनावट रेरा प्रमाणपत्र सादर करत शेकडो खरेदीदारांच्या फसवणुकीची प्रकरणे ताजी असताना आता नवी मुंबईतही बोगस बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ग्राहकांना गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोठीवली गाव परिसरात महापालिकेच्या नगररचना विभागाचे बनावट प्रमाणपत्र बनवून बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री सुरू असल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत.
महापालिकेने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असला तरी ऐरोली, घणसोली, दिघा विभाग कार्यालयांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अशाप्रकारे बेकायदा बांधकामे आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. बेसुमार पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे ठाणे तसेच डोंबिवलीसारखी शहरे यापूर्वीच बदनाम झाली आहेत.
दिवा येथील बेकायदा बांधकामांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्वत:हून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्यामुळे विद्यमान महापालिका आयुक्त सौरभ राव यांना अनेकदा नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. दिव्यातील एका प्रकरणात तर राव यांना न्यायालयाने स्वत: उपस्थित राहून बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्द तर बेकायदा बांधकामांचे आगार मानले जाते. या भागात ५४ इमारतींचे बनावट रेरा प्रमाणपत्र प्रकरणामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी अडचणीत सापडले आहेत. असे असताना लगतच असलेल्या नवी मुंबई शहरातही बेकायदा बांधकामे आणि त्या माध्यमातून होणारी ग्राहकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकरणे आता उघडकीस येऊ लागली आहेत. यामुळे महापालिकेचा अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अपयश उघडे पडू लागले आहे.
फिफ्टी-फिफ्टीची बांधकामे रोखण्यात अपयश
नवी मुंबईतील काही ठराविक गावांलगत असलेल्या सिडको तसेच खासगी मालकीच्या मोकळ्या जागा बळकावून सर्रास बेकायदा बांधकामे करणारी एक मोठी टोळी गेल्या काही वर्षात सक्रिय आहे. ऐरोली, दिघा, घणसोली, कोपरखैरणे यासारख्या उपनगरांमध्ये तर या बांधकामांना आता धरबंद राहिलेला नाही. विद्यमान महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिव्यातील प्रकरणानंतर तर सर्व विभाग अधिकाऱ्यांना अशी बांधकामे रोखण्याचे सक्त आदेश दिले. त्यानंतरही ऐरोली, दिघा, घणसोली विभाग कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अशी बांधकामे सुरूच आहेत. गोठीवली परिसरातील अशाच एका प्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागाची बनावट प्रमाणपत्र सादर करुन ग्राहकांची फसवणूक केली गेल्याचे उघडकीस आले आहे. नगररचना विभागाची बांधकाम परवानगी तसेच काही इमारतींचे बोगस भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन इमारतीमधील सदनिकांची विक्रि सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी महापालिकेच्या नगररचना विभागाने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
कळवा-विटाव्याची टोळी नवी मुंबईत?
ठाणे महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांसंबंधी उच्च न्यायालयाने कडक आदेश दिल्याने आयुक्त सौरभ राव सध्या अडचणीत सापडले आहेत.
न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या काही महिन्यांपासून कळवा, विटावा, दिवा, मुंब्रा या भागातील बेकायदा बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे कळवा-विटाव्यातील भूमाफिया आणि बेकायदा बांधकामे करण्यात पारंगत असलेल्या टोळीने आपला मोर्चा नवी मुंबईच्या दिशेने वळविला आहे.
दिघा, ऐरोली, गोठीवली, तळवली या भागात यापूर्वीच यापैकी काही बांधकाम माफिया सक्रिय होते. स्थानिकांना हाताशी धरून हजारो बेकायदा घरांची उभारणी आजवर करण्यात आली आहे.
असे असताना आता तर महापालिकेची बोगस प्रमाणपत्र तयार करुन घरांची विक्री सुरू झाल्याने नवी मुंबईतही भविष्यात या बांधकामांचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अशाप्रकारचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत. या प्रकरणी तक्रारही दाखले केलेली आहे.सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक, नगररचना विभाग, नमुंमपा