संतोष जाधव

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे प्रारुप प्रभागरचना शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली असून पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेत २८ प्रभाग असून १११ नगरसेवक असणार आहेत. राज्यभरात करोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु केली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यत देण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारुप प्रभागरचना जाहीर केली असून या प्रभागरचनेत २७ प्रभाग हे ४ नगरसेवकांचे असून उर्वरीत १ प्रभाग हा ३ नगरसेवकांचा असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात संबंधीत प्रभागरचनेची माहिती घेऊन हरकती सूचना येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेत नवी मुंबई महापालिकेत १४ गावांच्या सहभागासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहेे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून याबाबत हरकती सूचना घेण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर हरकती सूचना स्विकारल्या जाणार नाहीत. प्रारुप प्रभागरचना पालिकेच्या वेबसाईटवरही जाहीर करण्यात आली आहे.भागवत डोईफोडे, उपायुक्त निवडणूक व मालमत्ता विभाग , नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई महापालिका स्थिती…

एकूण सदस्य -१११

४ सदस्यीय संख्या- २७

३ सदस्यीय संख्या- १

एकूण प्रभागांची संख्या- २८

नवी मुंबई महापालिकेत १४ गावांच्या सहभागावरुन गणेश नाईक यांचा सातत्याने विरोध असतानाही निवडणूक आयोगाच्या व राज्य शासनाच्या निर्देशानुसार या १४ गावांच्यासह प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. नव्या १४ गावांचा सहभाग हा पालिकेच्या प्रारुप प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक १४ मध्येच आहे. नव्याने सहभागी झालेल्या गावांचा सहभाग हा प्रभाग क्रमांक १४ मध्ये असून त्यात नवी मुंबई महापालिकेच्या जुन्या एमआयडीसी पावणे गाव, श्रमिकनगर अडवली भुतवली ,कातकरीपाडा तुर्भे स्टोअरमधील काही भाग तसेच गणपतीपाडा व वारलीपाडा या भागांचा सहभाग आहे.

प्रारुप प्रभाग रचना कुठे पाहाल…

नवी मुबई महापालिकेने जाहीर केलेली प्रारुप प्रभागरचना पालिकेच्या वेबसाईटवर तसेच पालिका मुख्यालय, आणि पालिकेची ८ विभाग कार्यालय या ठिकाणी लावण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात प्रारुप प्रभागरचना पाहता येणार आहे.