नवी मुंबई : शहरात नव्याने होणाऱ्या इमारती तसेच पुनर्विकासातील इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीमुळे बांधकामाचे साहित्य पदपथावरच पडून असते. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथ सोडून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. सीवूड्स सेक्टर २५ येथे महाविद्यालयासमोरील पदपथ बांधकाम साहित्याने अडविल्याने विद्यार्थी रस्त्यावरून मार्गक्रमण करतात. येथेच एका बाजुला पदपथ तर दुसऱ्या बाजुला सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल आहे. त्यामुळे पादचाऱ्यांचे रस्त्यावरून मार्गक्रमण धोकादायक ठरू शकते.

पालिकेने व संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. मात्र बांधकामविषयक अनेक नियमच धाब्यावर बसविण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत. वाशी, सीवूड्स विभागात बांधकामासाठी ब्लास्टिंगचा मनमानी वापर होत असतो. याबाबत पालिकेने बांधकाम नियमावलीही जाहीर केली आहे. पण या नियमावलीचा विविध ठिकाणी भंग होत असतो. सीवूड्स परिसरात बांधकाम व्यावसायिकाने पदपथच गिळंकृत केला आहे.

सीवूड्स रेल्वेस्थानक पूर्व भागात अनेक शैक्षणिक संकुले व शाळा, महाविद्यालये आहेत. नागरिक, विद्यार्थी चालताना पदपथाचाच वापर करतात. मात्र इमारतीसाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या, पेव्हर ब्लॉक तसेच लोखंडी जाळ्या निर्मितीचे साहित्य या पदपथावर पसरलेले असते. एका बाजुला पदपथ तर दुसऱ्या बाजुला सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपुल आहे. महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्यावरुनच धोकादायक पद्धतीने चालावे लागते.

वाशी सेक्टर २ परिसरात मेघदूत सिनेमा, अबॉर्ट हॉटेल परिसरात सुरु आहेत. वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अनेक बांधकाम व्यावसायिकांचे बांधकामाचे साहित्य, तसेच यंत्र पदपथावरच ठेवले असताना त्यावर कारवाई झाली होती. अशीच कारवाई सीवूड्स सेक्टर २५ येथे करण्याची मागणी होत आहे.

व्यावसायिकांना बांधकामाबाबत नियमावली निश्चित केली आहे. बांधकामाचे साहित्य पदपथावरच ठेवले असेल तर संबंधित अधिकाऱ्यामार्फत पाहणी करुन कारवाई करण्यात येईल. – सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक, नगररचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीवूड्स स्थानकाबाहेर पूर्वेला आमचे महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या शेजारीच नव्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरुनच जावे लागते. त्यामुळे अपघाताची भीती आहेच. हे पदपथ चालण्यासाठी मोकळे असणे आवश्यक आहे – दिनेश वर्मा, विद्यार्थी