नवी मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने कार्यालयात जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. मध्यरेल्वेच्या काही स्थानकांवर रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्याचा परिणाम हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरही जाणवत असून या मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. परिणामी सकाळी कार्यालयीन प्रवासासाठी निघालेल्या नोकरदार वर्गाला रेल्वे स्थानकात ताटकळत उभे रहावे लागले. तर अनेक गाड्या उशिराने सुटल्याने स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळाली.

सकाळी लवकर घराबाहेर पडूनही गाड्या वेळेत न मिळाल्याने प्रवाशांचा त्रास अधिक वाढला. विशेषतः वाशी, नेरुळ, पनवेलसह हार्बर मार्गावरील स्थानकांवर आणि ट्रान्स हार्बरवरील ठाणे, ऐरोली, नेरुळ या स्थानकांवर गर्दीचे प्रमाण लक्षणीय होते.

कुर्ला-चुनाभट्टी-शिव रेल्वे स्थानकांत पाणी

सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वेच्या सखल भागात पाणी साचल्याने रेल्वे गाड्यांचा वेग कमी झाला आहे. यातील कुर्ला-चुनाभट्टी-शीव ही रेल्वे स्थानके सखल भागात असल्याने याठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. परिणामी, मध्य रेल्वे १५-२० मिनिटे उशिराने धावत आहे.

हवामान खात्याचा अंदाज

दरम्यान, हवामान खात्याने मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून पुढील दोन दिवस शहर आणि उपनगरांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. घाटमाथा व कोकण विभागासाठी तर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचसोबत पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास रेल्वे सेवा ठप्प होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.

मध्यरेल्वेच्या गाड्यांना झालेल्या विलंबाचा थेट परिणाम हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर जाणवत असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाला प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याचा अलर्ट पाहता येत्या दोन दिवसांत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.