नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ११ दिवसांवर येऊन ठेपले आहे. या विमानतळाच्या स्थापत्य कलेविषयी चर्चा होऊ लागली आहे. विमानतळाच्या बाहेरील व आतील बाजूस कमळ फुलाच्या आकाराप्रमाणे पाकळ्यांची प्रतिकृतीची रचना साकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाच्या कामाचा नुकताच आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रवाशांनी विमानतळामध्ये प्रवेश केल्यावर त्यांना एका मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र दिसावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) रचनेतून या प्रतिमेचे रूपांतर स्थापत्याच्या भाषेत झाले आहे. टर्मिनलचे छत त्याच्या प्रवाही रूपरेखांतून अवकाशात उमलणाऱ्या पाकळ्यांचा भास निर्माण करते. मध्यवर्ती प्रवेशद्वार कमळाच्या सरोवरासारखे आहे, तर केंद्रातून विखुरलेली त्रिज्येच्या आकारातील अन्य स्थळे बाहेरच्या बाजूला वळलेल्या पाकळ्यांसारखी दिसते. काचेचे दर्शनी भाग आणि जाळीकाम (जाळीचे किंवा छिद्रे असलेले पडदे) यांची रचना कमळाची पाने व जाळीपासून प्रेरणा घेऊन केलेली आहे, त्यामुळे प्रवाशांना सावलीही मिळेल, वायूविजनही उत्तम राहील आणि त्याचवेळी नैसर्गिक प्रकाश सौम्य होऊन आत येत राहील असे सांगितले जात आहे.
अंतर्गत सजावटीमध्ये कमळाची प्रतिमा सूक्ष्म मार्गांनी वापरण्यात आली आहे. फरशी, छत आणि अगदी रस्ते दाखवणाऱ्या खुणांमध्येही ही प्रतिमा सूक्ष्म पद्धतीने येते. कमळाच्या आकाराच्या छतामुळे वातावरणात थंडावा राखण्यात मदत होईल. दिवसाचा जास्तीत-जास्त प्रकाळ मिळेल आणि यांत नवीनीकरणीय ऊर्जा व पाण्याच्या रिसायकलिंगच्या सुविधाही सामावल्या जातात. स्थापत्य कलेचा हा नमुना वास्तुविशारद झाहा हादीद (झेडएचए) या लंडनस्थित स्टुडिओची ही संकल्पना असल्याचे सांगितले जात आहे.
प्राचीन कलेचे प्रतीक
कमळ हे फक्त एनएमआयएचे दृष्यचिन्ह नसून ते त्याच्या वास्तुरचनेचे मार्गदर्शक तत्त्व आहे. एनएमआयएच्या टर्मिनलमधून प्रवास करणारे प्रवासी एका अशा कथेत पाऊल ठेवतील जी युगानुयुगे ऋषी-मुनी आणि कलाकारांना प्रेरणा देत आली आहे. आता तीच कथा पोलाद, काच आणि प्रकाशात नव्याने साकारली आहे, अशी माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या प्रवक्त्याने दिली.