उरण : येथील न्हावा शेवा रेल्वे स्थानक आणि तालुक्यातील इतर रहदारीच्या मार्गावरही मानवी शरीराला घातक असलेला राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. त्यामुळे आरोग्याचा व पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्यातच राडारोड्याचे ढीग टाकले गेल्याने पादचाऱ्यांची गर्दी, वाहतूक कोंडीसारख्या समस्यांनी नागरिक हैराण आहेत.उरण परिसरात बांधकामातील अवशेष मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या टाकण्यात येत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा राडारोडा टाकण्यात येत आहे. काही ठिकाणी थेट रस्त्यावर राडारोडा फेकल्याने वाहनांचे नुकसान, कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील मोठ्या प्रकल्पांमधून निघणारा राडारोडा आणून तो उरणच्या परिसरात टाकला जात आहे. या विरोधात न्यायालयीन लढाई ही लढली जात आहे. उरण पनवेल या दोन्ही तालुक्यांतील ओसाड जागी अशा प्रकारचे राडारोड्याचे डोंगर उभे राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवाज उठवला आहे. प्रशासनाने तातडीने दोषींवर गुन्हे दाखल करून हा प्रकार थांबवावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
कारवाईला विलंब
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, राडारोडा, कचरा यामुळे आरोग्यच नाही तर संपूर्ण पर्यावरणीय संतुलन धोक्यात येते. त्यामुळे शासनाने बांधकामाच्या कचरा व्यवस्थापनासाठी कड़क नियम लागू करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन या माफियांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घातक कचऱ्यामध्ये हानीकारक रसायनांचे अंशही येत असल्याने जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणप्रेमींनी हा विषय वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे, मात्र अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, राडारोडा माफियांचे मनोबल वाढते आहे.
राडारोडा टाकण्यात येणाऱ्या जागेवर मालकांनी देखरेख करण्याची गरज आहे. बांधकाम तोडीनंतर हा राडारोडा येत असून ते अडवून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे यात दगड असल्याने लवकर रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात येईल.सतीश पडवळ, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ