नवी मुंबई : माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आज (२५ सप्टेंबर, गुरुवार) मुंबई एपीएमसीच्या कांदा-बटाटा बाजारात भव्य माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने माथाडी कामगार, कार्यकर्ते आणि विविध पक्षांच्या नेते मंडळींनीही हजेरी लावली होती.

परंतु, कार्यक्रम आटपून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे निघाल्यानंतर अचानक एक लहानसा अपघात झाल्याने सर्वांची धावाधाव झाली. माथाडी कामगार नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निघत असताना, त्यांच्या मागील गाडीत बसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, चालकाने गाडी सुरू केल्याने पाटील यांचा तोल बिघडला आणि ते खाली कोसळले. हे पाहताच क्षणी आजूबाजूला उपस्थित सुरक्षारक्षक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आधार देत उभे केले.

या अपघातात पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपस्थितांमध्ये हा प्रसंग पाहून काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र, त्वरित मदत मिळाल्याने सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.