नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोची इत्थंभूत माहिती असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा मेट्रोची सद्यस्थिती जाणून घेतली असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुढील महिन्यात नवी मुंबईतील या पहिल्या मेट्रो मार्गाचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे. त्यासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्त ठरविला जाण्याची शक्यता आहे. सिडकोने सर्व सोपस्कर आणि तयारी पूर्ण केल्याने शुभारंभाचा नारळ वाढविण्याची तयारी केंद्र व राज्य सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांनी दाखविल्यास ही सेवा सुरू केली जाणार आहे.
नवी मुंबईच्या दक्षिण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने चार मेट्रो मार्गाची आखणी केली आहे. त्यातील बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मे २०११रोजी सुरू करण्यात आले आहे. मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे हे काम पहिल्या चार वर्षांत पूर्ण होण्याऐवजी आता दहा वर्षांनी अर्ध पूर्ण होत आहे.
सडकोचे व्यवस्थाकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी संथ गतीने चाललेल्या या मेट्रो कामाला गती देण्यास प्राधान्य दिले. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन ऐवजी महामेट्रोला या प्रकल्पावर देखरेख व अभियंता साहाय्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या या प्रकल्पातील खारघर ते पेंधर या पाच किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील अर्धा टप्पा पूर्ण करण्यास यश आले आहे. या मार्गावरील ऑसिलेशन, विद्युत, सुरक्षा, अति आवश्यक ब्रेक, प्रमाणपत्रासह रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षाविषयक चाचणी प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. या मार्गावर चालणाऱ्या डब्यांनाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. केवळ हिरवा झेंडा दाखवण्याचा अवकाश असून नवी मुंबईतील पहिली मेट्रो धावणार आहे.
गेली अडीच वर्षे केंद्र व राज्यातील सरकारे ही वेगळया विचारसरणीची असल्याने या मार्गाच्या शुभारंभासाठी सर्वाच्या तारखा जुळून येत नव्हत्या मात्र आता राज्यात अस्तित्वात आलले शिंदे फडणवीस सरकार यांनी निर्णयाचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबईतील सर्व महत्त्वांच्या प्रकल्पांची पुन्हा एकदा माहिती घेतली असून नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. नगरविकास मंत्री असताना शिंदे यांनी खारघर ते पेंधर या मेट्रो मार्गाचा प्रवास चार महिन्यापूर्वी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर काही दिवसातच या मार्गाचा शुभारंभ होण्याची शक्यता सिडको वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यासाठी १५ ऑगस्टची चाचपणी केली जात असून यासाठी केंद्र व राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्याची उपस्थिती आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.