पालिकेचे नियोजन; सिडको प्रदर्शनी केंद्रात सर्व सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : करोनाकाळात पालिकेने शहरात १३ करोना काळजी केंद्रांसह पालिकेचे वाशी येथील रुग्णालय करोनासाठी राखीव ठेवले होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाली असून १३ पैकी ९ काळजी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तर वाशी येथील पालिकेचे रुग्णालय सामान्य रुग्णालय केले आहे. आता इतर चार काळजी केंद्रेही बंद करण्यात येणार असून सिडको प्रदर्शनी केंद्र व डॉ.डी वाय पाटील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होणार आहेत.

सोमवारी पालिका आयुक्तांना शहरातील करोना परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला. यात आणखी दोन केंद्रे बंद करण्याबाबत निर्णय घेतला असून एकाच ठिकाणी उपचारांबाबत नियोजन केले आहे. सद्य:स्थितीत लेवा पाटीदार सभागृह ऐरोली व निर्यात भवन तुर्भे येथे कमी करोना रुग्ण आहेत. तर वाशी प्रदर्शनी केंद्र व राधास्वामी सत्संग भवन तुर्भे या ठिकाणी काही प्रमाणात रुग्ण आहेत. त्यामुळे  ज्या ठिकाणी कमी उपचाराधीन रुग्ण आहेत त्या ठिकाणचे केंद्र आढावा घेऊन बंद करण्यात येणार आहेत. शहरातील १३ काळजी केंद्रांपैकी आतापर्यंत  ९ केंद्रांत नवीन रुग्णांना प्रवेश देणं बंद केले आहे. आणखी दोन केंद्रांत प्रवेश बंद होणार आहेत.

करोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दिवसाला शंभरच्या खाली करोना रुग्ण सापडत असून शहरातील एकूण खाटांपैकी ८० टक्के खाटा  रिकाम्या आहेत. करोनामुक्तीचा दरही ९५ टक्के इतका आहेत. शहरात करोनाबाधितांची संख्या आतापर्यंत ४९ हजार ६५३ झाली आहे तर १०१५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही फक्त एक हजारापर्यंत खाली आली आहे.

नेरुळ, ऐरोली रुग्णालयात मनुष्यबळाचा वापर

पालिकेतील बंद करण्यात आलेल्या ९ काळजी केंद्रांतील आरोग्यसेवा देणाऱ्यांना  शहरातील नेरुळ व ऐरली येथील रुग्णालयात अधिक उपचारसुविधा देण्यासाठी हलविण्यात आले आहे. त्यामुळे  वाशी येथील एकाच केंद्रावर करोना उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

बंद काळजी केंद्रे

वाशी सेक्टर १४, वारकरी भवन बेलापूर, सीबीडी सेक्टर ३, आगरी कोळी भवन, सेक्टर ९ नेरुळ, सावली सेक्टर ५ नेरुळ, समाजमंदिर सेक्टर ५ ऐरोली, ईटीसी केंद्र वाशी, बहुउद्देशीय केंद्र ५ कोपरखैरणे तसेच इंडिया बुल येथे एकही करोना रुग्ण नाही. तर कमी रुग्ण असलेली आणखी दोन केंद्रे बंद होणार आहेत.

उपचाराधिन रुग्ण 

* वाशी प्रदर्शनी केंद्र :  १३३

* राधास्वामी सत्संग , तुर्भे : ६१

* लेवा पाटीदार सभागृह : ७

* निर्यातभवन तुर्भे : ६

नवी मुंबईत ६२ नवे रुग्ण

नवी मुंबई : नवी मुंबईत मंगळवारी ६२ नवे करोनाबाधित आढळले असून एक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधितांची संख्या  ४९,७१५ इतकी झाली असून मृतांचा आकडा १०१६  इतका झाला आहे. शहरात करोनामुक्तीचा दर ९५ टक्के असून एकूण ४५,५७० जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या नवी मुंबईत १,१२९  उपचाराधीन रुग्ण आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal commissioner reviewed the corona situation in the city at the meeting zws
First published on: 15-12-2020 at 00:26 IST