नवी मुंबई : सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम दिशांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांची वस्ती निर्माण झाली होती. पालिकेने कारवाई करत ती हटवल्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी वास्तव्य करत असल्याने पालिकेने याच उड्डाणपुलाखाली व्हॉलीबॉल, बॅडमिंटन तसेच फुटबॉल टर्फची सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भिकाऱ्यांची वस्ती झालेल्या उड्डाणपुलाखालचे रूपडे पालटणार आहे.
पुढील काही महिन्यांतच हे काम पूर्ण करण्यात येणार असून या कामाची महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांनी सीवूड्स उड्डाणपुलाखाली व्हॉलीबॉल, बॅडमिंटन व टर्फ मैदान पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला उड्डाणपुलाखालील जागेत भिकाऱ्यांनी ठाण मांडून परिसर अस्वच्छ करून टाकला होता. भिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ताच अडवत परिसरात सर्वत्र दुर्गंधी करून टाकली होती. तसेच अर्धनग्न अवस्थेत हे भिकारी परिसरात पदपथावर ठाण मांडून राहत होते.
उड्डाणपुलाखाली मध्यरात्रीपर्यंत भिकाऱ्यांचा आरडाओरडा, मारामारी व शिवीगाळ तसेच अश्लील प्रकार पाहायला मिळत होते. याबाबत ‘लोकसत्ता’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. परंतु आता पालिका उड्डाणपुलाखालील जागेत खेळाची सुविधा निर्माण करणार आहे.सीवूड्स उड्डाणपुलाखालील बेकायदा वस्ती करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई केली. याच पुलाखाली विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
पालिकेने या ठिकाणी व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल टर्फ सुविधा निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात केली असून लवकरात लवकर या ठिकाणचे काम पूर्ण करण्यात येणार असून सीवूड्स रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागात उड्डाणपुलाखाली खेळण्याची सुविधा निर्माण होणार आहे. – मदन वाघचौडे, कार्यकारी अभियंता