नवी मुंबई : नवी मुंबई शहराला फ्लेमिंगोंच्या वास्तव्यामुळे ‘फ्लेमिंगो सिटी’ असे संबोधले जाते. मात्र पालिकेने सुशोभिकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांच्या खर्चातून शहरातील चौकाचोकांमध्ये साकारलेल्या कृत्रिम फ्लेमिंगोंनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या कृत्रिम सौंदर्यावरील खर्चावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवी मुंबईचे ‘फ्लेमिंगो सिटी’ असे ब्रॅंन्डींग करण्यासाठी व सुशोभीकरणासाठी बेलापूर ते ऐरोली क्षेत्रात पालिकेने विविध चौकात फ्लेमिंगोंच्या कृत्रिम प्रतिकृती उभारल्या आहेत. त्यासाठी पालिकेने कोट्यवधींचा खर्च केला आहे. परंतु शहरात विविध ठिकाणी निर्माण केलेल्या कृत्रिम फ्लेमिंगोंनी आता माना टाकायला सुरुवात झाली आहे. त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
कृत्रिम फ्लेमिंगोसाठी ४१ कोटी
फ्लेमिंगोंच्या प्रतिकृतीसाठी चौकाचौकात केलेल्या खर्चासाठी ४१ कोटी रुपये खर्च केले गेले असून त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. नैसर्गिक फ्लेमिंगो टिकवण्यासाठी पालिकेने कांदळवने व शहरातील पाणथळ जागा वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला होता. कांदळवन बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न कणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला होता.
नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोंच्या कृत्रिम प्रतिकृती उभारुन करोडोंचा खर्च केला आहे. त्यापेक्षा फ्लेमिंगोंचे नैसर्गिक अधिवास वाचवण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. चौकाचौकात फ्लेमिंगो कुठे पाहायला मिळतात ती ठिकाणे, त्यांची नावे लावा. फ्लेमिंगो बघायला नागरिक येतात, तेथे प्रसाधनगृहांची निर्मिती करा. केवळ चौकाचौकात फ्लेमिंगोंच्या प्रतिकृती लावण्यात अर्थ नाही.- सुनील अग्रवाल, सेव्ह नवी मुंबई एन्हवायर्नमेंट
नवी मुंबई शहरात विविध चौकात लावलेल्या फ्लेमिंगोंच्या प्रतिकृती काही वर्षांपूर्वीच लावलेल्या आहेत. त्यामुळे आता नव्याने कोणत्याही फ्लेमिंगोच्या प्रतिकृती लावल्या जाणार नाहीत. नैसर्गिक फ्लेमिंगोची ठिकाणी नवी मुंबईत कोठे आहेत त्यांचे दिशादर्शक लावण्यात येतील.- शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका