रत्नागिरीतील तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागामार्फत कोकण विभागातील धरणांची तपासणी करण्याचे दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाचीही तपासणी करण्यात आली. यात मोरबे धरण हे तांत्रिक व स्थापत्यदृष्टय़ा उत्कृष्ट असल्याचा दाखला पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. खालापूरनजीक धावरी नदीवर  हे धरण असून या धरणामुळेच नवी मुंबई जलसंपन्न आहे. तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर कोकण विभागातील ज्या १४ धरणांची तपासणी केली त्यात मोरबे धरण होते.

सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या अलोरा रत्नागिरी येथील विभागाचे उपकार्यकारी अभियंता शशांक कुलकर्णी व विक्रम राजे यांनी शुक्रवारी धरणाची तपासणी केली. स्थापत्यबाबींबरोबरच

यांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. रेडियल दरवाजे, आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यक दरवाजा, सेवा गेट यांची पाहणी केली. विद्युत पुरवठा खंडित झाला तर करण्यात आलेली जनरेटरची व्यवस्था या सर्व बाबींची तपासणी केल्यावर मोरबे धरण मजबूत स्थितीत असून देखभाल दुरुस्ती चांगली असल्याचा अभिप्राय दिला आहे.

शासनाच्या आदेशान्वये धरणाची तपासणी केली असता मोरबे धरण हे तांत्रिकदृष्टय़ा व स्थापत्यदृष्टय़ा उत्कृष्ट असून धरणाची देखभाल व स्वच्छता अतिशय चांगली आहे. प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र दापोडी पुणे येथे अभियंत्यांना प्रशिक्षणकाळात प्रत्यक्ष भेटीसाठी उत्कृष्ट असलेले मोरबे धरण दाखवण्यात यावे याबाबतची शिफारस केली आहे.     – शशांक कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अलोरा रत्नागिरी.

मोरबे धरणाची पाहणी व तपासणी संबंधित शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी केली असून मोरबे धरण यांत्रिकदृष्टय़ा उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय दिला आहे.      – मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, मोरबे प्रकल्प

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation morbe dam mpg
First published on: 23-07-2019 at 02:32 IST