नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील जुन्या सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्थांना कायमस्वरुपी भाडेतत्वावर जागा देण्यासाठी महापालिका धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी मंगळवारी दिले. अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेत या संस्थांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत हे आश्वासन देत या संस्थांना मोठा दिलासा दिला. ‘लोकसत्ता’ने या संस्थांच्या प्रश्नांविषयी गेले काही दिवस सातत्याने आवाज उठवल्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगत संस्थांच्या प्रतिनिधींनी लोकसत्ताचे आभार मानले.
वाशी सेक्टर ३ येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीभवनातील या संस्थांची कार्यालये असलेल्या जागा तात्काळ रिकाम्या करण्याच्या नोटिसा पालिकेने २५ जुलै रोजी बजावल्या होत्या. त्यामुळे या संस्थांसह शहरातील सुजाण नागिरकांमध्ये पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रचंड चीड निर्माण झाली होती. यासंदर्भात पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या समवेत पालिकेच्या मालमत्ता विभागाचे अधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यात संस्थांना आहे त्या जागेतून कोणी हलवणार नसून या संस्थांना कायमस्वरुपी भाडेतत्वावर जागा देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेणार असल्याबद्दलची ठाम भूमिका अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी संस्थांसमोर मांडली.
‘अतिरिक्त आयुक्तांनी आम्हाला भाडेतत्वावर दिलेल्या जागा रिकामी करणार नसून तात्काळ नोटीसा परत घेण्याचे आश्वासन बैठकीत दिले आहे. तसेच दिर्घमुदतीसाठी जागा देण्याबाबतही आश्वस्त केले आहे.त्यामुळे आम्हा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना मोठा दिलासा मिळाला आहे,’ अशी प्रतिक्रिया नवी मुंबई स्वयंसेवी संघटनेच्या सचिव अमरजा चव्हाण यांनी व्यक्त केली.
गझलकार आप्पा ठाकूर म्हणाले, ‘सामाजिक संस्थांना जागा खाली करण्याच्या नोटीसा पाठवल्यानंतर याबाबतचा पहिला आवाज ‘लोकसत्ताने’उठवला. त्यामुळे पालिका प्रशासनाला सामाजिक संस्थांच्याबाबतची भूमिका मवाळ करावी लागली. सामाजिक भान जपत आवाज उठवलेल्या लोकसत्ताचे आमच्या कला,साहित्य, संस्कृती जपणाऱ्या तमाम साहित्यप्रेमी व सामाजिक संस्थातर्फे खरच कौतुक आहे.’
‘केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करून उपयोग नाही तर तिथे राहणाऱ्या समाजाला साहित्य, कला, संस्कृती जतन करणाऱ्या संस्थांचीही तितकीच आवश्यकता असते,’ असे वाशी साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी म्हणाले.
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात सिडको काळापासून काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे काम अतिशय चांगले, मोलाचे असून या सामाजिक संस्थाना वाशी येथील समाजमंदिरातील जागा रिकामी करण्यासाठीच्या नोटीसा पालिका परत घेणार आहे. तसेच या संस्थांना कायमस्वरुपी दीर्घ मुदतीवर जागा देण्याबाबतही धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. डॉ.राहुल गेठे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका