नवी मुंबई महापालिकेची लसीकरणाची तयारी
नवी मुंबई</strong> : करोनाच्या लसीकरणासाठी पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ही लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून त्यासाठी २० हजार कर्मचाऱ्यांची नावनोंदणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
यात अधिकारी,डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका, आशा व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच शहरातील खासगी आरोग्यसेवेशी निगडित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी प्रत्यक्ष लसीकरणासाठी सहभागी होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
देशात सध्या दोन ते तीन कंपन्यांच्या करोना लसींची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्थानिक पातळीवर लसीकरणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व प्रशासकीय प्रमुखांना त्यांच्या हद्दीतील सरकारी तसेच खासगी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावनोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लसीकरणातील इतर कर्मचाऱ्यांना मंगळवारी आरोग्य विभागामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ४२ केंद्रांमधील ४ हजार ५०० कर्मचारी तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील १५ हजार कर्मचारी यांची पालिकेने संगणकीकृत नोंद केली असून उरलेल्यांची नोंदणी सुरू आहे.
लसीकरणाबाबतचे आदेश आल्यानंतर संबंधितांना ठिकाण व दिवस याबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून लस
प्राप्त झाल्यानंतर साठवणुकीठी आवश्यक तयारी सुरू केली आहे. शहरातील नागरी आरोग्य केंद्र, शाळा, खासगी रुग्णालये अशा विविध ठिकाणी लसीकरणाबाबत नियोजन करण्यात आले आहे. एका एका दिवसात १०० जणांना लस देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.
लसीकरणाबाबत पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात साधारणत: २० हजार करोना योद्धय़ांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे. यासाठी तयारी करण्यात येत आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त
साठवणुकीचे नियोजन
१५ लहान शीतपेटी
०९ मोठी शीतपेटी
२६ अति शीतपेटी
१०६४ लस संचिका