नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर १५ येथील बहुमजली वाहनतळ इमारतीला आता आधुनिकतेची जोड मिळणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने या इमारतीत इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारित अत्याधुनिक ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे शहराच्या पार्किंग समस्येवर प्रभावी तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे.

बेलापूर येथील ही बहुमजली पार्किंग इमारत सुमारे ३४.६३ कोटी खर्चून बांधण्यात आली असून, डिसेंबर २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले होते. या बहुमजली इमारतीत ४७६ चारचाकी आणि १२१ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. मात्र, सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर कंत्राटदाराच्या व्यवस्थापनक्षमते अभावी जून २०२५ मध्ये ती बंद करण्यात आली होती. आता या इमारतीचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेने हा ‘स्मार्ट’ उपाय योजला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निविदेबद्दल आक्षेप घेतला असून, ज्या ठिकाणी दिवसाला १५-२० गाड्याही येत नाहीत त्या ठिकाणी एवढा खर्च करून अत्याधुनिक सुविधा पुरवणे म्हणजे हा केवळ जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

IoT प्रणालीचे फायदे आणि खर्च

नवीन निविदेनुसार, या ‘स्मार्ट पार्किंग’ प्रणालीच्या उभारणीसाठी अंदाजित खर्च ४७ लाख ठेवण्यात आला आहे. हा प्रकल्प सुमारे पाच महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक पार्किंग स्थळी सेन्सर्स बसवले जातील, ज्यामुळे जागांची उपलब्धता तात्काळ कळेल. याव्यतिरिक्त, नागरिक स्मार्टफोन ॲपद्वारे पार्किंगची जागा आरक्षित करू शकतील आणि पार्किंग शुल्काची भरणा स्वयंचलितपणे होईल, ज्यामुळे वेळेची बचत होईल.

इमारत प्रशस्त परंतु, ठेकेदार मिळेना

वाहनांना सुनियोजित पार्किंग करता यावी म्हणून उभारण्यात आलेली ही इमारत सध्या ठेकेदाराअभावी बंद अवस्थेत आहे. डिसेंबर २०२४ सालापासून सुरू झालेली ही इमारत क्षमतेपेक्षा निम्म्याही गाड्या येत नसल्याने ठेकेदाराने अखेर काम बंद केल्याचे सांगितले आहे. ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार, दिवसाला या वाहनतळात १५-२० गाड्याही येत नाहीत, कामगारांचे पैसेही सुटत नसल्याने शेवटी नाइलाजाने हे काम बंद करण्याची वेळ आली आहे. असे ठेकेदाराने म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे इमारत व्यवस्थापकाविना असताना पालिकेकडून मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याबाबत नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाहनतळात वाहनेच येत नसताना, नागरिकांच्या कराच्या पैशाचा हा अपव्यय आहे. असा आरोप केला आहे.

“बेलापूर सेक्टर १५ येथील बहुमजली इमारतीत आत्याधुनिक पार्किंग प्रणाली बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. IOT यंत्रणा लावल्याने वाहनचालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. वाहनतळात सध्या तुरळक वाहने येत असल्याने वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने या वाहनतळात वाहने उभी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात IOT तंत्रज्ञान कार्यरत झाल्यावर वाहन संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.” – मिलिंद पवार, उपअभियंता, बेलापूर विद्युत विभाग

“महापालिकेने जमिनीवरील वास्तव लक्षात घेऊन योजना आखायला हव्यात. नागरिकांकडून गोळा केलेल्या कराचा वापर खऱ्या गरजांसाठी व्हायला हवा, दिखाव्यासाठी नाही. करदात्यांच्या पैशांचा असा अपव्यय करणे म्हणजे नवी मुंबईकरांशी अन्याय आहे.” – सैय्यद नासिर हुसेन, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती