९८० कोटींवरून खर्च १२६१ कोटींवर
नवी मुंबई : करोनामुळे नवी मुंबई महापालिकेचा ताळेबंद बिघडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पालिकेचे १३४८ कोटींवर असलेले उत्पन्न या वर्षी नोव्हेंबपर्यंत १०६४ कोटीच राहिले असून २८४ कोटींची घट झाली आहे. उत्पन्न घटले असले तरी खर्चात मात्र वाढ झाली आहे. ९८० कोटींवर असलेला खर्च १२६१ कोटींवर गेला आहे.
२०१९-२० या वर्षांत पालिकेचा अर्थसंकल्प ४०२० कोटींचा होता तर शिल्लक जमा करता तो ४१७३ कोटींपर्यंत गेला होता. त्यामुळे या वर्षीही पालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकापेक्षा एकूण जमा जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र करोनामुळे नवी मुंबईत महापालिकेच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम झाला आहे. नोव्हेंबपर्यंत जवळजवळ १२६१ कोटींचा खर्च झाला आहे. त्यामुळे एकीकडे करोनाकाळात पालिकेचा खर्च वाढला आहे. मात्र उत्पन्न १०६४ कोटीच राहिले आहे.
दोन वर्षांतील जमा-खर्चाची आकडेवारी
वर्ष अंदाजपत्रक नोव्हेंबपर्यंत उत्पन्न नोव्हेंबपर्यंत खर्च
२०१९—२० ४०२० कोटी १३४८ कोटी ९८० कोटी
२०२०—२१ ४६०० कोटी १०६४ कोटी १२६१ कोटी
नोव्हेंबपर्यंत खर्च
* घनकचरा व्यवस्थापन : १४६ कोटी
* प्रशासकीय खर्च : २५५ कोटी
* रस्ते : १६७ कोटी
* आरोग्य विभाग : १०८ कोटी
* गार्डन : २८ कोटी
* अग्निशमन : ५ कोटी
* कर्ज परतावा : ३६ कोटी
* मोरबे व पाणीपुरवठा : १०७ कोटी
* मलनि:सारण : ४३ कोटी
नवी मुंबई महापालिकेत करोनाकाळात आरोग्यातील खर्चात वाढ झाल्याचे दिसत असले तरी उत्पन्नावर पालिकेने भर दिला आहे. यासाठी अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या वर्षीही अंदाजपत्रकाप्रमाणे उत्पन्न गाठण्यात यश मिळेल असा प्रयत्न आहे.
-अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त
मालमत्ता कर वसुली
२४० कोटी २०१९—२०
१४७ कोटी २०२०—२१