नवी मुंबई : नवी मुंबई शहराची पायाभरणी होत असताना याठिकाणी साहित्य, संस्कृती, कला जोपासल्या जाव्यात यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या जुन्या आणि अनुभवी अशा संस्थांवर महापालिका प्रशासनानेच गंडातर आणण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या उघडकीस आला आहे. शहरातील पहिले उपनगर असलेल्या वाशीत यापैकी अनेक संस्थांना सिडकोने सामाजिक भवनात भाडेतत्त्वावर जागा दिल्या होत्या. महापालिका प्रशसानाने नुकतेच या सर्व संस्थांना जागा तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा धाडल्या आहेत. विशेष म्हणजे, या संस्थांचे शहरासाठीचे योगदान काय, इतक्या वर्षानंतरही त्या करत असलेले काम याविषयीचे कोणतेही परिक्षण करण्यापूर्वीच प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
शहरातील टाऊन लायब्ररी, म्युझिक ड्रामा सर्कलपासून अगदी स्त्री मुक्ती संघटनांसारख्या संस्थांची पाळेमुळे वाशीतील या समाजमंदिरात रुजली आणि वाढली होती. मात्र सिडकोच्या जुन्या समाजमंदिराच्या जागी उभ्या करण्यात आलेल्या नव्याकोऱ्या इमारतीतून या संस्थेने तातडीने बाहेर पडावे अशा आशयाच्या नोटिसा महापालिका प्रशासनाने काढल्या आहेत. विशेष म्हणजे, या संस्थांचे शहरासाठीचे योगदान काय, इतक्या वर्षानंतरही त्या करत असलेले काम याविषयीचे कोणतेही परिक्षण करण्यापूर्वीच प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
नवी मुंबई शहराला सांस्कृतिक चेहरा नाही अशी ओरड सतत होत असली तरी सिडकोने जवळपास प्रत्येक उपनगरात सामाजिक भवन किंवा केंद्र उभे केले हे नाकारता येणार नाही. या केंद्रात त्या-त्या उपनगरांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक अथवा साहित्यिक कामांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना भाडेतत्त्वावर जागा देण्यात आल्या. वाशीत अशा संस्थांचे मोठे जाळे उभे राहिले. वाशी सेक्टर ६ येथे मराठी साहित्य संस्कृती मंडळाने शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक जाणीवा जिवंत ठेवण्यासाठी मोठे काम केले. दिवंगत अशोक कुंभार, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, ललित पाठक, विजय केदारे यासारख्या मंडळींनी शहरात वाचनसंस्कृती वाढावी, रुजावी यासाठी बरेच परिश्रम घेतले.
सिडकोने वाशीतील सामाजिक भवनात टाउन लायब्ररी, नूतन महिला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, नवी मुंबई म्युझिक ॲण्ड ड्रामा सर्कल, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था,नवी मुंबई स्पोर्टस क्लब, अलर्ट इंडिया अशा संस्थांना जागा दिल्या. पुढे ही वास्तू महापालिकेच्या ताब्यात आली. जुन्याचे नवे करण्याचा ध्यास घेतलेल्या महापालिकेने समाजमंदिराची जुनी इमारत पाडून तिकडे आलिशान इमारत उभी केली. तत्कालिन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना शहराच्या जडणघडणीची जाण होती. त्यांनी या इमारतीमध्येच वाचन, कला, साहित्य संस्कृती जपण्याचे काम करणाऱ्या संस्थांना पुन्हा जागा दिल्या. जुन्या संस्थांनाही महापालिकेने आपल्या कार्याची दखल घेतल्याची जाणीव होती. त्यांनी महापालिकेला आभाराचे पत्र पाठविले आणि पुन्हा नव्या वास्तूत जोमात काम सुरू केले.
दरम्यान सगळे काही सुरळीत सुरू असताना महापालिका प्रशसानाने नुकतेच या सर्व संस्थांना जागा तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटीसा धाडल्या आहेत. या सर्व संस्था महापालिकेने ठरवून दिलेले भाडे भरतात. संस्थांचे कामही उत्तम सुरू आहे. ग्रंथालय, अभ्यासिकेत मुलेही मोठ्या प्रमाणावर येत असतात. असे असताना महापालिकेने ही वास्तू निविदा प्रक्रियेद्वारे भाड्याने देण्याची नवी टूम काढत थेट या संस्थांना बाहेरचा रस्ता दाखविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘३१ जुलैपूर्वी जागा रिकाम्या करा आणि महापालिकेला ताबा द्या,’ असा दमच महापालिकेने या संस्थांना भरला आहे. अचानक आलेली या नोटीस पाहून अवाक् झालेल्या संस्थांच्या प्रतिनिधींनी सध्या महापालिका मुख्यालयात खेटे घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहराच्या जडणघडणीविषयी काडीची माहिती नसलेले अधिकारी या संस्था चालकांना आज या उद्या या असे सांगत टोलवत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. यासंबंधी महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडी यांनीही प्रतिसाद दिला नाही.
वाशी सेक्टर ३ येथील समाज मंदिरातील विविध समाजसेवी संस्थांना जागा रिकामी करण्याबाबत पत्र दिले आहे. या समाजसेवी संस्थांच्या सिडकोकडून काय नोंदी आलेल्या आहेत याची अधिक माहिती घेण्यात येईल. – भागवत डोईफोडे, उपायुक्त, मालमत्ता विभाग
नवी मुंबई शहरात अगदी सुरुवातीपासूनच शहरातील स्वय्ंसेवी संघटना, संस्था शहरात कला, क्रीडा, संस्कृती जतन करण्यासाठी काम करतात. प्रामाणिकपणे शहराला सांस्कृतिक, साहित्यिक ओळख निर्माण करण्याचे काम या संघटनांनी संस्थांनी केले आहे. पालिकेची स्थापना होण्यापूर्वीपासून म्हणजेच सिडकोपासून या संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व पालिकेने नियोजित केलेले आकारणी अगदी व्यवस्थित देणाऱ्या या संस्थांना अशा प्रकारे वागणूक योग्य नाही. याबाबत पालिका आयुक्तांशी याबाबत भेट घेणार आहे.- प्रा. वृषाली मगदूम, अध्यक्ष सामाजिक स्वयंसेवी संघटना, नवी मुंबई
शहरात आम्ही वाचन संस्कृती जपण्याचे काम वाशीत सुरू झालेल्या सिडको कार्यकाळपासून काम करत आहोत. वाचनसंस्कृती, कला जोपासण्याचे काम करणाऱ्यांना पालिकेने भाड्याने दिलेली जागा खाली करण्याचे दिलेले पत्र पाहून आम्हालाही धक्का बसला आहे. पालिकेने याबाबत योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. – विजय केदारे, टाऊन लायब्ररी वाशी