नवी मुंबई : नवी मुंबई शहरात अगदी सिडको काळापासून शहरातील साहित्य, संस्कृती, कला जोपासना करण्याचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना महात्मा जोतिबा फुले स्मृतिभवनातील जागा तात्काळ खाली करण्याचे लेखी पत्र पालिकेने दिले आहे. यामुळे शहरातील साहित्य, कला, संस्कृतीसाठी धडपडणाऱ्या विविध संस्था आणि साहित्यिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नवी मुंबई शहरात मागील अनेक वर्षे टाऊन लायब्ररी, नूतन महिला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, न्यू बॉम्बे म्युझिक अँड ड्रामा सर्कल, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, नवी मुंबई स्पोर्टस क्लब, अलर्ट इंडिया अशा विविध संस्था सामाजिक कामांतून शहरातील साहित्य संस्कृती व कला जोपासण्याचे काम करत असताना पालिकेने यांना जागा खाली करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. दुसरीकडे निविदा प्रक्रिया राबवून या संस्थांना कायमचे बाहेर करण्याच्या प्रकाराबाबत नवी मुंबई शहरात चीड निर्माण झाली आहे. पालिकेविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शहराची वाचन, कला, साहित्य संस्कृती जपण्याचे काम या संस्था करत आहेत. नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर ३ येथील महात्मा फुले बहुउद्देशीय इमारतीतून या संस्थांना बाहेर काढण्याचा प्रकार सुरू असल्याने राग व्यक्त होत आहे. पालिकेतील अधिकारी पदावर असलेल्या आणि साहित्य क्षेत्रात काम करणारे अधिकारीही वाशीतील टाऊन लायब्ररीतील पुस्तके वाचून अधिकारी झाले आहेत. पालिकेने या सर्व संस्थाना आहे त्या ठिकाणीच भाडेतत्वावर कायमस्वरुपी जागा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबईत साहित्य, कला संस्कृती जोपासणाऱ्या जुन्या संस्थांबद्दल पालिकेने घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून शहरात कला, साहित्य, संस्कृती जपणाऱ्या संस्था टिकवल्या पाहिजेत.
आप्पा ठाकूर, गझलकार
नवी मुंबईत सिडकोच्या निर्मितीबरोबरच या शहराचे साहित्य, कला , नाट्य , वाचन जपण्याचे काम करणाऱ्या संस्थांना तुम्ही बंद करण्याचा डाव करता. अमराठी देवस्थानांना सिडकोने करोडोंचे भूखंड दिले पण वाचनसंस्कृती टिकावी यासाठी मिन्नतवाऱ्या करणाऱ्या मराठी संस्थाना भूखंड दिले नाहीत उलट भाड्याने राहून आपले शहराची संस्कृती जतम करणाऱ्या संस्थांना हाकलण्याचा प्रकार सुरू आहे. याविरोधात ८० व्या वर्षी पालिकेच्या विरोधात वेळ पडल्यास उपोषण करेन.
ललित पाठक, सहकार्यवाहक, कुसुमाग्रज वाचनालय, सीवूड्स
तत्कालीन सिडको जनसंपर्क अधिकारी साहित्यिक राजा राजवाडे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई शहरात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ निर्माण होईल या उद्देशाने ४८ वर्षांपूर्वी या संस्थांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता पालिका शहरातील सांस्कृतिक साहित्यिक व सामाजिक चळवळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे.
सुभाष कुलकर्णी, अध्यक्ष, साहित्य मंदिर. वाशी
अतिशय जुन्या असलेल्या या संस्थांना सध्या असलेल्या इमारतीतच जागा द्यायला हवी. निविदा प्रक्रियेतून या संस्थांना वगळले पाहिजे. अन्य़था नियमाचा आधार घेऊन संस्थांना बेदखल करण्याचा प्रकार होईल. अमरजा चव्हाण, साहित्यिक, नवी मुंबई स्वयंसेवी संघटना पदाधिकारी