नेरुळमध्ये लवकरच चार मजली इमारत; सिडको व महापालिकेत भूखंड करारनामा

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुबंई : ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारून कौतुकास पात्र ठरलेल्या महापालिकेने आता त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्याचे ठरविले आहे. हे वृद्धाश्रम नेरुळ येथे होणार असून यासाठीचा भूखंड करारनामा महापालिका व सिडकोत झाला आहे. लवकरच काम सुरू होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

देशभरात ज्येष्ठ नागरिकांना आधार देणारी व त्यांची शुश्रूषा करणारी सामाजिक व खासगी संस्थांचे हजारो वृद्धाश्रम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देशात व राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिका वृद्धाश्रम तयार करणारे पहिले शहर ठरणार आहे.

नवी मुंबई महापालिका वृद्धांसाठी सर्वसमावेशक धोरण आखत आहे. यापूर्वी ज्येष्ठांना आधार व विरंगुळा देणारी अनेक विरंगुळा केंद्रे निर्माण केली आहेत. आपल्या जीवनाच्या सरत्या काळात आनंदाची, आपलेपणाची, आपुलकीची व प्रेम देणारी केंद्र अशी ओळख या केंद्रांची झाली आहे. आता पालिका ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे वृद्धाश्रम नेरुळ येथे तयार करण्यात येणार असून यासाठी महासभेत ठरावही मंजूर करण्यात आला आहे. नुकताच सिडकोने वृद्धाश्रमाचा भूखंड पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच वृद्धाश्रम निर्मितीला सुरुवात होणार आहे. नेरुळ सेक्टर ३८ येथील भूखंड क्रमांक १३ येथे हा वृद्धाश्रम होणार आहे. तळमजला अधिक चार मजल्यांची इमारत करण्यात येणार असून तळमजल्यावर वृद्धाश्रम कार्यालय, स्वयंपाकघर व जेवणाचा कक्ष प्रस्तावित आहे. तर पहिल्या मजल्यावर स्टेज, चेंजिंग व स्टोअर रूम बनविण्यात येणार आहे. दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर  वृद्धांना राहण्याची सोय करण्यात येणार आहे. ९ हजार ७६३ फुटांचे बांधकाम करण्यात येणार आहे.आमदार मंदा म्हात्रे यांनी वृद्धाश्रमाची मागणी केली होती.

शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे उभारण्यात आली आहेत. आता लवकरच वृद्धाश्रम निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सिडकोबरोबर भूखंडाचा भाडे करारनामा ११ नोव्हेंबर रोजीच झाला आहे. त्यामुळे पालिकेने निविदा प्रक्रियाही राबवली आहे.
– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका