पनवेल : रस्त्यात दुचाकीवरून सोन्याचे दागीने घेऊन जाणा-या दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून गुरुवारी सायंकाळी लुटण्यात आले आहे. पाच लाख ९० हजार रुपयांचे दागीने लुटल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. चोरट्यांना सोने घेऊन जाणार होता याची कोणी माहिती दिली याविषयी खांदेश्वर पोलीस तपास करत आहेत. खांदेश्वर उपनगरात तीन दिवसांपूर्वी एका दूकानात शिरून चोरट्याने दूकानदाराच्या गळ्यातून सोनसाखळी व मोबाईल फोन हिसकावण्याची घटना ताजी असताना गुरुवारी सायंकाळी खांदेश्वर येथील रेल्वे उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराला लुटीची घटना समोर आली.
ज्या व्यक्तीची लुट झाली तो तरूण एका फायनान्स कंपनीत दागीने व रोख रक्कम वाहतूकीचे काम करतो. पनवेल शहरातील प्रसिद्ध फायनान्स कंपनीच्या संचालकांनी याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळच्या पाच वाजण्याच्या सूमारास घडलेल्या घटनेची माहिती दिली. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला.
दुचाकीवरून शैलेश कांबळे याने पनवेल येथील फायनान्स कंपनीचे मालक सुयोग बांठीया यांना रस्त्यात घडलेला लुटीचा प्रसंग सांगीतला. शैलेश हा दुचाकीवरून जात असताना उड्डाणपुलावर त्याला काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीने थांबवले. शैलेश यांना चाकूचा धाक दाखविल्याने तो घाबरल्याचे त्याने मालकाला सांगीतले. आणि चोरट्यांनी शैलेशजवळील सोनसाखळी, सोन्याच्या बांगड्या आणि दिड लाख रुपयांची रोकड असा एेवज घेऊन ते चोरटे पसार झाले.याबाबत रात्री साडेदहा वाजता फायनान्सचे मालक सुयोग बांठिया यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेनंतर खांदेश्वर पोलीसांसह नवी मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत.