नवी मुंबई : मुंबई महानगर पट्ट्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई प्रदेशात अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीची साखळी मोडून काढण्यासाठी मागील दोन-अडीच वर्षांपासून हाती घेतलेल्या मोहीमेमुळे या संपूर्ण व्यवहारात अनेक वर्षापासून सक्रिय असलेला तस्करांचा थवा पूर्णपणे विखरून टाकण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, असा दावा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

एखाद्या पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे ही साखळी अनेक वर्ष संघटीतपणे कार्यरत होती. यापैकी बरेचसे चालक अटकेत आहेत, अनेकांची रवानगी त्यांच्या मूळ देशात करण्यात आली आहे तर यापैकी काही आसपासच्या शहरांमध्ये परागंदा झाले आहेत, असेही भारंबे यांनी सांगितले. नवी मुंबई बाहेर पळून गेलेल्या चालकांच्या इतर शहरांमधील यंत्रणांनीही मुसक्या आवळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई पोलिसांनी राबविलेले नशामुक्त अभियान, गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेली कारवाई, काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रभावी व्यक्तींची झालेली अटक यासंबंधी भारंबे यांच्याशी लोकसत्ताच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थांच्या खरेदी- विक्रीची साखळी मोडून काढण्यासंबंधी वेळोवेळी संबंधीत यंत्रणांना कठोर सूचना दिल्या आहेत.

देशभरात यासंबंधी मोठे छापे टाकले गेले आहेत आणि महत्वाच्या बंदरांवरुन हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलिसांनी गेल्या अडीच वर्षांत महामुंबई प्रदेशातून हा व्यापार उद्धस्त करण्यासाठी अनेक मोठया मोहिमा राबविल्या. त्यामुळे या आघाडीवर आम्ही ही साखळी मोडीत काढण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरलो आहोत असा दावा भारंबे यांनी केला.

अंमली पदार्थांची खरेदी-विकी करणाऱ्यांची एक ठराविक पद्धत असते. यासंबंधीचे कायदे तसेच सुस्पष्ट असले तरी आरोपिंना जेरेबंद करताना अनेक आव्हानांना पोलिसांना तोंड द्यावे लागते. यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापे टाकल्यावर या साखळीत सक्रिय असलेले चालक अंमली पदार्थ तातडीने नष्ट करतात. घरातील स्वच्छतागृहात मालाची विल्हेवाट लावणे, पुरावा सापडणार नाही अशा पद्धतीने अंमली पदार्थ फेकण्यात ही मंडळी तरबेज असतात. त्यामुळे किती कोटींचा माल पकडला त्यापेक्षा कितीतरी कोटी रुपयांचा माल या छाप्यांदरम्यान नष्ट झालेला असतो. एखाद्या मोठ्या पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे ही टोळी कार्यरत असते. नवी मुंबई पोलिसांनी सातत्याने राबविलेल्या मोहीमांमुळे हा थवा आता विखुरला आहे, असा दावा भारंबे यांनी केला.

विशेष पथके, अनेक जेरबंद

नवी मुंबई शहरातून मुख्य मार्ग, महामार्ग जातात. या मार्गांचा वापर करुन अमली पदार्थांचे तस्कर गैरफायदा घेऊन अमली पदार्थांची विक्री करत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदारांना हे अमली पदार्थ तस्कर लक्ष्य करत असतात. त्यामुळे विविध मार्गांवरून येणाऱ्या या अमली पदार्थांच्या साठ्यावर कारवाई करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विविध पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलिसांचे क्षेत्र दिघा शहरापासून ते पनवेल, उरण पर्यंत आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांसमोर या अमली पदार्थ तस्करांना रोखण्याचे मोठे आव्हान असते. असे असतानाही नवी मुंबई पोलिसांनी मागील सुमारे अडीच वर्षांत अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे.

जप्त अमली पदार्थ

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये एमडी, मेथाक्युलोन, गांजा, कोडीन सिरप, एलएसडी, चरस, एम्फेटामाईन, हेराॅईन, ब्राऊन शुगर, कोकेन, ट्रामाडोल यासांरख्या अमली पदार्थांचा सामावेश आहे. हे अमली पदार्थ मानवी शरीरासाठी घातक आहेत.

९९ विदेशी नागरिक

नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांसोबतच त्याची तस्करी करणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांविरोधातही कारवाईचा बडगा उगारला. मागील अडीच वर्षांच्या कालावधीत एक हजार १३२ जणांना अटक झाली आहे. त्यापैकी ९९ विदेशी नागरिकांचा सामावेश आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३

एकूण गुन्हे – आरोपी – साठा (रुपयांत)

२९०- ३५३- २१,१३,३७,४४६

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४

एकूण गुन्हे – आरोपी – साठा (रुपयांत)

४८५- ६०९- ३२,३५,९९,४८

१ जानेवारी ते ३१ मार्च

एकूण गुन्हे – आरोपी – साठा (रुपयांत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३७- १७०- ३,९६,८४,४४४