नवी मुंबई : घणसोली गाव ते डी मार्ट या दहा मिनिटे अंतराच्या प्रवासात एका महिलेचे १९ लाख १३ हजार रुपये ठेवलेली पिशवी अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात खबर देताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. यात पिशवी घेतलेली व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून चोरीचा ऐवज जप्त केला आहे.
करंजाडे येथे राहणाऱ्या शकुंतला गायकर यांच्या घरी काही दिवसापूर्वी चोरी झाली होती. सुदैवाने घरातील दागिने व रोकड वाचली होती. मात्र या भीतीने त्या घरातील दागिने जवळच बाळगत होत्या. काही कामानिमित्त ३१ तारखेला त्या मुलाच्या रिक्षात घणसोली येथे आल्या होत्या. काम संपल्यावर परत जात असताना घणसोली गाव ते डी मार्ट या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरात त्यांच्या कडील पिशवी त्यांच्या नकळत कोणी तरी घेऊन गेला.
याच पिशवीत ७ लाख २० हजार रुपयांचा ८ टोळ्यांचा मणिहार, ५ लाख ४० हजार रुपयांचे ६ टोळ्यांचे गंठण, ५ लाख ४० हजार रुपयांचे अन्य ८ टोळ्यांचे गंठण, ४५ हजार रुपयांची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, १५ हजार रुपयांचा फोन, ७ हजार रुपयांची रोकड होती. डी मार्ट बस थांब्यापर्यंत आल्यावर त्यांना पिशवी सोबत नाही हे लक्षात आले. त्यांनी परत परत अनेकदा शोधली. ज्या ठिकाणाहून त्या निघाल्या तसेच जेथून जेथून आल्या त्या सर्व ठिकाणी पिशवी शोधली. मात्र सापडली नसल्याने कोणीतरी चोरी केली असा संशय त्यांना आल्याने त्यांनी याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्हीची पाहणी केली असता एका व्यक्तीकडे पिशवी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने पिशवी पोलिसांच्या कडे दिली. ज्यात सर्व ऐवज मिळून आला. याबाबत पुढील चौकशी सुरु आहे.